डोंबिवली एमआयडीसी परिसरात विषारी वायू प्रदूषणाच्या दोन दुर्घटना घडूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून दोषी कंपनी मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीतील मंडळाच्या कार्यालयाची तोडफोड केली.
प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कोंडून आत धूर फवारणी करण्याचा बेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी रचला होता. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला. शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह शरद गंभीरराव, राजन मराठे, प्राजक्त पोतदार, प्रल्हाद म्हात्रे, मनोज घरत, मनोज राजे, प्रशांत पोमेंडकर आदींनी पोलिसांचे कडे तोडून मंडळाच्या कार्यालयात धडक मारून कार्यालयात तोडफोड केली. अधिकारी अगोदर पळून गेल्याने एकही अधिकारी मनसे सैनिकांच्या हाती लागला नाही.
कंपनी मालक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संगनमताने कारभार करीत असून जनतेला त्याचा त्रास होत आहे. वातानुकूलित कार्यालयात बसून या अधिकाऱ्यांना जनतेला होणारा त्रास दिसत नसल्याने मनसेने आज अधिकाऱ्यांना वायू प्रदूषण दाखवून देण्याचा निर्णय घेतला होता. मनसे सैनिकांना महात्मा फुले पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका केली.