शेत पाण्याने भरलेले, धानाचे खुंट कुजलेले, बांधीच्या पाळी खचलेल्या, शेतकऱ्यांच्या आशा आणि स्वप्न अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेलेले. घरेही पडलेली. सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे चेहरेही काळवंडलेले, उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतीच्या बकाल अवस्थेने शेतकऱ्यांच्या डोळ्या जमा झालेले अश्रू केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ५ ऑगस्टला अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी करून डोळ्यात साठवले आणि नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा निर्धार केला.
मुख्यमंत्र्यांसमवेत नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या विदर्भातील नुकसानीचा आढावा पटेल यांनी घेतला. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा घाई गडबडीत चुकीचा अहवाल सादर केल्याने नाराज झालेल्या पटेलांनी अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी आमदार राजेंद्र जैन यांना सोबत घेऊन ते अधिकाऱ्यांसह रवाना झाले. गोरेगाव तालुक्यातील दवळीपार-बोटे येथे एका पडलेल्या घराची पाहणी केली. त्याला नुकसानीचा मोबदला मिळेल, असे सांगितले. पुढे तेथील पाणी भरलेल्या शेतासमोर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांना उभे करून याला काय म्हणाल, असा तडक सवाल केला. रोवणी केलेल्या शेतात पाणी जास्त झाले तर शेतकरी शेतातील पाणी मार्ग करून बाहेर काढतात. परंतु, अजूनही या शेतात पाणी भरले असल्याने या शेतातील पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. तरी आपण जिल्ह्य़ातील ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा अहवाल सादर करता, अशा शब्दात अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.  
पटेलांनी या दौऱ्यात विविध ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सव्‍‌र्हेक्षण झाले की नाही, याबद्दल विचारणा केली. शेतकऱ्यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावर पटेलांनी शासनाने जो अहवाल तयार केला आहे तो अंतिम नाही. आपण जिल्हा प्रशासनाला पुन्हा सव्‍‌र्हेक्षण करायला लावून प्रत्येक नुकसानग्रस्ताला मदत मिळवून देऊ, असे सांगून आश्वस्त केले. पालेवाडा येथील कृषी सहायक आणि तलाठींना प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ सव्‍‌र्हेक्षण करून शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घ्या, असे निर्देश दिले.
त्यांनी या दौऱ्यात झांजिया, दवळीपार, बोटे, सोनी, चिल्हाटी, बबई, मोहाडी, गिधाडी, चिल्हाटी, तुमसर, तेढा, महाजनटोला, कलपाथरी, कुणबीटोला व पालेवाडा या गावातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. निवेदने स्वीकारली. जिल्हाधिकारी डॉ.अमित सनी यांना शेतकरी व नागरिकांच्या समस्या अवगत करून दिल्या. वारंवार पुराचा तडाखा बसत असलेल्या महाजनटोला येथील नागरिकांचे पुनवर्सन करण्याची मागणी तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी आमदार राजेंद्र जैन, देवेन्द्रनाथ चौबेंसह अन्य अधिकारी  व   मोठया संख्येत शेतकरी  उपस्थित होते.

Story img Loader