संरक्षणाची सर्वपक्षीयांची मागणी
शहरातील काही गुन्हेगारांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते हत्येचा कट केल्याने  त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आज सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली.
नगरकर सभागृहात झालेल्या बैठकीस काँग्रेसचे नगरसेवक संजय छल्लारे, राजेंद्र आदिक, आशिष धनवटे, भाजपाच्या नगरसेविका भारती कांबळे, शिवसेनेचे राजेंद्र देवकर, अशोक थोरे, मनसेचे बाबा िशदे, तिलक डुंगरवाल, नितीन पटारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण फरगडे, भगवान सोनवणे, काँग्रेसचे बाबासाहेब खोसरे, अशोक उपाध्ये, भाजपाचे संजय पांडे, गणेश राठी, अभिजित कुलकर्णी, डॉ. शांतीलाल पाटणी, बजरंगदलाचे विजय जयस्वाल, मराठा महासंघाचे दत्तात्रय कांदे आदी उपस्थित होते.  शहरात दहशतवादी कृत्ये चालतात. अनेक देशद्रोह्यांचे व गुन्हेगारांचे वास्तव्य शहरात असते. त्याची माहिती विविध यंत्रणांना चित्ते यांनी दिली आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याचे पत्र पोलिसांनी त्यांना दोन वर्षांपूर्वीच दिले. आता त्यांच्या हत्येचा पुन्हा कट करण्यात आला आहे. गुन्हेगारांची दादागिरी वाढली असून पोलिसांचा वचक  राहिलेला नाही. राज्यभर गुन्हे करून गुन्हेगार शहरात येतात. परप्रांतिय तसेच राज्याच्या विविध भागातून अनेक गुन्हेगार येथे येऊन राहतात. त्यांना आधार कार्ड व रेशन कार्ड मिळते. गुन्हेगारांच्या विरूद्ध आवाज उठविणारांना धम्नया दिल्या जातात. त्याचा बंदोबस्त पोलिस करीत नाहीत. याबद्दल निषेध करण्यात आला. तसेच चित्ते यांना त्वरीत पोलिस संरक्षण द्यावे, त्यांच्या जिवाला धोका झाल्यास त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील, असे स्पष्ट करण्यात आले.   दागिने चोरण्याचे धूमस्टाईल प्रकार शहरात वाढले असून त्यांच्यावर कुठलीही कारवाई पोलिसांनी केलेली नाही. शहरात दादागिरी वाढली आहे. शहरात कोठेही हातगाडय़ा लावल्या जातात. पोलिस काहीही करीत नाहीत. कायदा व सुव्यवस्था धोक्यातआली आहे. त्याबद्दलही पोलिसांचा निषेध बैठकीत करण्यात आला.