दिग्दर्शक प्रकाश झा यांनी आपला ‘सत्याग्रह’ चित्रपट १५ ऑगस्ट २०१३ रोजी प्रदर्शित करण्याची घोषणा गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी केली, मात्र हा १५ ऑगस्टचा मुहूर्त व त्याही नंतर घोषित केलेला  २३ ऑगस्टचा मुहूर्त बारगळला आहे. या दिवशी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे लक्षात येताच त्यांनी झा यांनी  ‘सत्याग्रह’साठी ३० ऑगस्टचा दिवस निवडला आहे.
‘सत्याग्रह’मध्ये अमिताभ बच्चन, करीना कपूर, अजय देवगण, मनोज बाजपेयी, अर्जुन रामपाल असे मोठमोठे कलाकार आहेत.  त्यासाठी गेल्या वर्षीच झा यांनी मोठमोठय़ा जाहिराती करून स्वातंत्र्यदिनीच चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकापाठोपाठ एक असे तीन बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांची मुख्य भूमिका असलेला ‘चेन्नई एक्सप्रेस’ प्रदर्शित होत आहे. त्यानंतर १५ ऑगस्टला मिलन ल्युथारिया दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे   एकापाठोपाठ एक दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्याच आठवडय़ात ‘सत्याग्रह’ प्रदर्शित झाला तर योग्य होणार नाही, असे त्यांना वाटते आहे.
लागोपाठ तिसऱ्या आठवडय़ात चित्रपट प्रदर्शित झाला तर तो त्या गर्दीतला भाग वाटेल. त्यापेक्षा एक आठवडा मोकळा जाऊन मग ३० ऑगस्टला ‘सत्याग्रह’ प्रदर्शित झाला तर चित्रपटाबद्दलची उत्सुकता कायम ठेवता येईल, असा विचार करून ‘सत्याग्रह’च्या प्रदर्शनाची तारीख ३० ऑगस्ट करण्यात आली असल्याची माहिती प्रकाश झा यांनी दिली आहे.

Story img Loader