एखाद्या मुद्यावर वाद घालत बसण्यापेक्षा स्वत:च्या प्रभावी सहभागाने समस्या सोडविण्यावर प्रमोद महाजन यांचा अधिक भर होता. सहकाऱ्यांना बळ देणारे महाजन हे अक्षय ऊर्जेचे भांडार होते, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केले.
व्यंकटेश महाजन महाविद्यालयात आयोजित प्रमोद महाजन स्मृती राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पध्रेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष खासदार पीयूष गोयल, राष्ट्रीय सचिव पूनम महाजन, मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार पंकजा पालवे, पत्रकार सुनील चावके, रेखा महाजन, राहुल महाजन, अॅड. मििलद पाटील, प्राचार्य डॉ. अनार साळुंके यांची उपस्थिती होती.
सुषमा स्वराज म्हणाल्या, की ही स्पर्धा केवळ महाजन परिवाराची नव्हे, तर भाजप परिवारासाठी महत्त्वाचा क्षण आहे. वक्तृत्वाच्या जोरावर व्यक्ती आकाश आपल्या कवेत घेऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण प्रमोद महाजन आहेत. ते बोलायला उभे राहिले की वेळसुद्धा थांबायची. घंटी वाजवून त्यांना सभागृहात कधीच सभापतींना थांबवावे लागले नाही. त्यांच्या ओघवत्या वाणीमुळे सभापती महोदयसुद्धा हरवून जायचे. त्यांना दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ त्यांच्या वाटय़ाला आपसूक येई. एखादे अपयश झाकून टाकायचे असेल, तर त्याच्यावर टीका करीत बसण्यापेक्षा दुसरे यश मिळविणे हेच प्रभावी उत्तर आहे, ही विचारधारा घेऊन ते सतत काम करायचे. पराभवाची नतिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी मोठे धाडस लागते, ते त्यांच्या ठायी होते. २००४मध्ये झालेल्या पराभवानंतर प्रमोद महाजनांनी त्याचे दर्शन घडविले. तरुणच देशाचे भवितव्य बदलू शकतात. तरुणांनी स्वत:च्या ठायी असलेल्या नसíगक गुणाच्या बळावर राजकीय आकाश गाठावे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘ऐ अजल तुझ से बहुतही सख्त नादानी हुयी
फूल ओ तोडा की गुलशन भर की विरानी हुयी’
अशा शब्दांत प्रमोद महाजनांच्या जाण्याने झालेले दु:ख त्यांनी व्यक्त केले.
पुरुषांबरोबर महिलांनी राजकारणात आपली ओळख निर्माण करण्यासाठी ‘नारीत्व’ सोडण्याची गरज नाही. स्त्रीत्व सोबत ठेवूनदेखील यशस्वी काम करता येऊ शकते. त्यासाठी ‘फूल नही चिंगारी हूँ’ असा नारा देण्याऐवजी ‘फूल और चिंगारी हूँ’ असे म्हणत आपल्यातील स्त्रीत्व, मातृत्वाचा नसíगक आविष्कार मोठय़ा आदराने जपत पुरुषांपेक्षाही अधिक मोठी झेप घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
आमदार शेलार, पालवे यांनी प्रमोद महाजन भाजपचे चाणक्य होते, अशा शब्दांत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. खासदार गोयल यांनी गुणवत्तेवर निर्णय घेणारा प्रतिभासंपन्न नेता असे महाजनांचे वर्णन केले. पूनम महाजन यांनी उस्मानाबादकरांनी महाजन परिवाराला भरभरून प्रेम दिल्याचे सांगितले. आता महाजन परिवाराला उस्मानाबादकरांना देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी उस्मानाबादकरांना मोठय़ा प्रमाणात योगदान देणार असल्याचे त्या म्हणाल्या.
अॅड. मििलद पाटील यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. अशोक गोरे, प्रा. विनोद वायचळ यांनी केले. आमदार ओम राजेिनबाळकर व सुधाकर भालेराव, माजी खासदार गोपाळराव पाटील, रूपाताई पाटील-निलंगेकर, माजी आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, सुजितसिंह ठाकूर, गोिवद केंद्रे, प्रवीण सरदेशमुख आदी उपस्थित होते.
वादविवाद स्पध्रेत नागपूरची बाजी
वादविवाद स्पर्धेत प्रथम पारितोषिक रोख १५ हजार रुपये, करंडक व प्रमाणपत्र नागपूर येथील एलएडी महाविद्यालयाच्या स्वायमा सरफराज अहमद व आस्था मििलद िशदे यांनी, दुसरे सात हजार रुपये रोख, चषक आणि प्रमाणपत्र हे बक्षीस उत्तर प्रदेशातील दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालयाच्या अमित भोलानाथ त्रिपाठी व कुँवरप्रताप हरिश्चंद्र गुप्त यांना, तर तिसरे ५ हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्रावर पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या राजक पीयूष रामप्रसाद आणि मंगेश उद्धव जगताप यांनी आपले नाव कोरले. विजेत्यांना सुषमा स्वराज यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. िहदी भाषेतून उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या आग्रा येथील एस. टी. जॉन्स महाविद्यालयाच्या आनंदश्री शिवकुमार व विक्रांत रामस्वरूप सिंग यांना एक हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इंग्रजी भाषेतून प्रभावी वक्तृत्व सादर करणाऱ्या मुंबई येथील व्ही. जे. वझे महाविद्यालयाच्या विशाखा शरद पाटील व ज्योती विजय मल्होत्रा या विद्यार्थिनींचाही एक हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मराठीसाठी इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा सत्याप्पा िहदुराव मोरे, हिन्दीसाठी दीनदयाळ उपाध्याय महाविद्यालयाचा अमित भोलानाथ त्रिपाठी, तर इंग्रजीसाठी नागपूर येथील एलएडी महाविद्यालयाची स्वायमा सरफराज अहमद हिचा पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पध्रेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. सुहास पाठक, डॉ. बावीस्कर, रेखा ढगे, शहनाज औसेकर, प्रा. मोहिनी पत्की यांनी काम पाहिले.