कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत मेळावे घेऊन कार्यकर्त्यांची मते अजमावल्यानंतर मनसे नेत्यांनी आपला अहवाल अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला आहे. या अहवालानंतर मनसेत मोठय़ा प्रमाणावर पक्षांतर्गत बदल अपेक्षित असून निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.
कल्याण आणि डोंबिवली अशा दोन्ही शहरांमध्ये मनसेची बऱ्यापैकी ताकद असून पक्षाच्या शहराध्यक्ष पदासाठी मोठय़ा प्रमाणावर चुरस आहे. या पदासाठी माजी आमदार हरिश्चंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रकाश भोईर, दिनेश तावडे, शरद गंभीरराव, मंदार हळबे, राजेश कदम, राजन मराठे यांची नावे चर्चेत       आहेत.
 पाटील, भोईर आणि हळबे हे आगामी विधानसभा निवडणुकीची स्वप्ने पाहत असल्याने ते या शर्यतीत कितपत उतरतील याविषयी मनसे कार्यकर्त्यांमध्ये शंका आहे.
डोंबिवली, कल्याण शहरप्रमुख पदासाठी प्रथमच महिला कार्यकर्त्यांचा विचार करण्यात येणार आहे. डोंबिवलीत या पदासाठी मंदा पाटील, वैशाली दरेकर, कोमल निग्रे यांची नावे चर्चेत आहेत. कल्याणमध्ये पूजा तावडे, मीनाक्षी डोईफोडे यांची नावे आघाडीवर आहेत.
अशोक मांडले, राहुल कामत, दीपिका पेडणेकर यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्याचा विचार पक्षात सुरू आहे. विप्लव भागवत, प्रशांत पोमेंडकर, मनोज घरत यांचा विचार प्रवक्तेपदासाठी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीचा विचार करून हे सर्व फेरबदल करण्यात येत असल्याचे मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले

Story img Loader