‘झी मराठी’बरोबर झालेल्या वादानंतर काहीसा प्रकाशझोताबाहेर गेलेला अभिनेता प्रसाद ओक तब्बल दीड वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. राजेश मालवणकर पहिल्यांदाच दिग्दर्शित करत असलेल्या ‘मी माझा नव्हतोच कधी’ या चित्रपटात प्रसाद प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटाचे चित्रीकरण बुधवारपासून पेणजवळ सुरू झाले.
आयुष्यात दोन प्रकारची माणसे भेटतात. एक स्वत:साठी जगणारी आणि दुसरी, दुसऱ्यासाठी जगणारी! ही दुसऱ्यासाठी जगणारी माणसे तसे कधी बोलूनही दाखवत नाहीत. मात्र आयुष्याच्या अखेरीस, आपण आपल्यासाठी कधी जगलोच नाही, ही भावना क्वचित त्यांच्या मनात घर करते. आमचा चित्रपटही नेमक्या याच भावनेवर आधारित आहे, असे मालवणकर यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
या चित्रपटाचा नायक नेहमी दुसऱ्यांच्या मर्जीनेच जगत आलेला आहे. करिअर, प्रेम, लग्न असे आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय त्याच्यासाठी दुसऱ्यांनीच घेतले आहेत. त्यानेही इतरांचे मन मोडू नये म्हणून कधीच आक्षेप घेतलेला नाही. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी त्याला ‘मी माझा नव्हतोच कधी’ ही भावना भेडसावत आहे, असे मालवणकर म्हणाले. या चित्रपटासाठी आपल्याला अतिशय प्रगल्भ अभिनेता हवा होता. त्यासाठी काही नावांचा विचारही झाला होता. मात्र अखेर प्रसादची निवड झाली, असेही त्यांनी सांगितले.
प्रसादसह या चित्रपटात अतुल तोडणकर, मनीषा केळकर, विनय आपटे, भूषण कडू, समिधा गुरू आदी कलाकार आहेत. या चित्रपटाचे प्रमुख निर्माते अतुल वनगे यांनी एक कविता लिहिली होती. या कवितेचे शीर्षकच ‘मी माझा नव्हतोच कधी’ असे होते. या कवितेवर एक गोष्ट लिहिण्यात आली आणि त्या गोष्टीवर आधारितच हा चित्रपट आहे, असेही मालवणकर म्हणाले.     

Story img Loader