विश्वविक्रमी १०,७०० वा नाटय़प्रयोग करण्यासाठी सज्ज असलेले प्रसिद्ध सिने-नाटय़ अभिनेते प्रशांत दामले यांचा मुंबई महापालिकेतर्फे नागरी सत्कार करण्याचा निर्णय महापौर सुनील प्रभू यांनी घेतला आहे.
‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाच्या प्रयोगाद्वारे प्रशांत दामले येत्या ६ जानेवारी रोजी १०,७०० वा प्रयोग सादर करणार आहेत. जगभरात नाटकाचे इतके प्रयोग करणारे ते पहिले कलावंत ठरणार आहेत. मराठी नाटय़ आणि चित्रपटसृष्टीत प्रशांत दामले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून त्याबद्दल चार वेळा त्यांची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. सिने-नाटय़सृष्टीत त्यांनी आतापर्यंत केलेली महत्त्वपूर्ण कामगिरी आणि येत्या ६ जानेवारी रोजी होणारा विश्वविक्रम लक्षात घेऊन प्रशात दामले यांचा महापालिका सभागृहात नागरी सत्कार करण्याचा महापौरांचा मानस आहे. त्यादृष्टीने पालिका सभागृहाच्या येत्या बैठकीमध्ये याबाबतची ठरावाची सूचना मांडण्यात येणार आहे. याबाबतचे एक पत्र महापौरांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांनाही पाठविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant damle will be honour by municipal corporation