मनपाची १४ ला ‘नामकरण’ सभा
सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मनपाच्या नव्या प्रशासकीय इमारतीस सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर आता नामकरणाच्या विषयांची एक स्वतंत्र सर्वसाधारण सभाच आयोजित करण्यात आली आहे. मात्र, त्यातून नेमका बोराटे यांचाच विषय वगळण्यात आला आहे. १४ सप्टेंबरला होणाऱ्या या सभेत नामकरणाचे तब्बल ५ विषय आहेत.
बोराटे यांनी महापौरांना पत्र देत सेनाप्रमुख ठाकरे यांचे नाव नव्या इमारतीला द्यावे अशी मागणी केली होती. बोराटे यांना सेना नेतृत्वाने सत्तापदापासून बाजूला ठेवले असल्याने ते नाराज आहेत. त्याच्यातून त्यांनी ही मागणी केली, असे सेना नेतृत्वाचे म्हणणे आहे. बोराटे यांनी आपल्या मागणीचा फॅक्स कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना केला. त्यातच त्यांच्याप्रमाणेच शहरातील सेना नेतृत्वावर नाराज झालेले जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनीही बोराटे यांच्या मागणीला पाठिंबा देत त्याचा विचार करावा असे पत्र महापौरांना दिले.
बोराटे यांची मागणी, तसेच त्यांना गाडे यांनी दिलेला पाठिंबा गुंडाळून ठेवत मनपातील सेना नेतृत्वाने सेनेबरोबरच भाजप सदस्यांचेही अन्य वास्तूंच्या नामकरणाचे विषय १४ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत घेतले आहेत. बोराटे यांनी ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केलेल्या इमारतीतील सभागृहाला सेनेचेच नगरसेवक दिलीप सातपुते यांनी राजमाता जिजाऊ सभागृह असे नाव द्यावे म्हणून प्रस्ताव दिला आहे. तशीच मागणी भाजपचे नगरसेवक शिवाजी लोंढे, तसेच सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनीही केली आहे.
आगरकर मळा येथील मनपाच्या मालकीच्या नियोजित उद्यानास (चाहुराणा बुद्रुक) स्वर्गीत मीनाताई ठाकरे उद्यान असे नाव देण्याची मागणी नितीन जगताप, सातपुते व कदम यांनी केली आहे. आगरकर मळा येथीलच एकता कॉलनी येथील सांस्कृतिक सभागृहास भाजपचे दिवंगत माजी खासदार सूर्यभान वहाडणे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सचिन पारखी यांनी दिला आहे. त्यांनीच तेथे उद्यानात स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यान व वाचनालयाला श्री गुरू सार्वजनिक वाचनालय असे नाव देण्याची मागणी केली आहे. केडगाव येथील आदर्शनगरमध्ये असणाऱ्या मनपाच्या मालकीच्या ओपन स्पेसमध्ये नवे सभागृह बांधण्यात आले आहे. त्याला शहीद जवान मेजर जावेद बकाली सभागृह असे नाव देण्याचा ठराव शिवाजी लोंढे यांनी दिला आहे. केडगावमध्येच गजानननगर येथे बांधण्यात आलेल्या सभागृहाला शाहू-फुले-आंबेडकर सभागृह असे नाव देण्याची मागणी त्यांनी केली आहे.    
प्रशासन चक्रावले
या सगळ्या नामकरण प्रस्तावांवर कडी म्हणून आता भारिप बहुजन महासंघाने मनपा प्रशासनाला पत्र देत मनपाच्या नव्या इमारतीस क्रांतीरत्न महात्मा ज्योतीबा फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. प्रशासनही नगरसेवक व आता संघटनांकडून येत असणाऱ्या नामकरण प्रस्तावांमुळे चक्रावून गेले आहे.

Story img Loader