कुस्तीचा उत्तर महाराष्ट्र केसरी किताब यजमान नगरच्या प्रताप गायकवाड याने जिंकला. कालपासून (शनिवार) येथे सुरू झालेल्या स्पर्धेत या किताबासह विविध वजनगटात नगरच्याच मल्लांनी पुर्ण वर्चस्व गाजवले. मातीच्या मैदानातील इनामी कुस्तीच्या लढतीत बाला रफिक शेखने हिंद केसरी युद्धवीर राणा याला अवघ्या काही सेकंदात पराभूत करत २ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.
उत्तर महाराष्ट्र केसरी किताबाची अंतिम फेरी प्रताप गायकवाड व अमित गाडे या दोन नगरच्याच मल्लांमध्ये झाली. गुणांवर गायकवाड याने ३ विरूध्द १ अशा फरकाने या कुस्तीसह किताब पटकावला. हे दोघेही नगरच्या श्री. शिवाजी चव्हाण यांच्या राजे संभाजी प्रशिक्षण केंद्राचे मल्ल आहेत. ही लढत ६ मिनिटे चालली, पहिल्या फेरीत अमितने १ गुणाने आघाडी घेतली मात्र नंतरच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये प्रतापने गुण मिळवत एक किलो चांदीची गदा पटकावली. किताबाच्या गटात नगरच्याच गुलाब आगरकरने तिसरे स्थान मिळवले.
जिल्हा तालिम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने वाडिया पार्क क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व लढती मॅटवर झाल्या. मात्र त्याचबरोबरीने मातीच्या मैदानात इनामी लढती आयोजित केल्या होत्या. मुख्य आकर्षण असलेल्या हिंदकेसरी युद्धवीर राणा (पानीपत, हरियाणा) व बाला रफिक शेख (करमाळा) यांच्यातील लढतीसाठी अडिच लाख रुपयांचे रोख बक्षिस जाहीर करण्यात आले होते. यापुर्वी दोघांतील लढतीत राणाने शेखवर मात केली होती. त्याचे उट्टे आज शेखने काढले. सलामीलाच राणाचा ताबा घेणाऱ्या शेखने अवघ्या काही सेकंदात दुहेरी पट काढून राणाला चितपट केले. मातीवरील अन्य लढतीत महेश वरुटे (कोल्हापूर) याने विकास जाधवचा (करमाळा) तर अमोल लंके (नगर) याने गौरव गणोरे (नाशिक) याचा पराभव करत पारितोषिक मिळवले.
विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे, पालकमंत्री बबनराव पाचपुते, आ. बापुसाहेब पटारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, दादा कळमकर, विक्रमसिंह पाचपुते, वैभव लांडगे, धनंजय जाधव, सहादु गुंजाळ आदींच्या उपस्थितीत पारितोषिके देण्यात आली.
अन्य वजनगटांच्या लढतीतील विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे आहेत. ८४ किलो- गणेश शेळके (नगर), महेश पवार (नाशिक), ७४ किलो- विश्वंभर खैरे (नगर), हर्षद सदगीर (नाशिक), ६६ किलो- अजित शेळके, किरण नलावडे (नगर). ६० किलो- संदिप कावरे (नगर), विक्रम शेटे (नाशिक). ५५ किलो- कृष्णा भगत (नाशिक), लखन जावडेकर (धुळे). ५० किलो- प्रकाश परदेशी (धुळे), योगेश पवार (नाशिक). ४५ किलो- ज्ञानेश्वर नाटे (नाशिक), विकास खोत (नगर).
नगरचा प्रताप गायकवाड उत्तर महाराष्ट्र केसरी
कुस्तीचा उत्तर महाराष्ट्र केसरी किताब यजमान नगरच्या प्रताप गायकवाड याने जिंकला. कालपासून (शनिवार) येथे सुरू झालेल्या स्पर्धेत या किताबासह विविध वजनगटात नगरच्याच मल्लांनी पुर्ण वर्चस्व गाजवले. मातीच्या मैदानातील इनामी कुस्तीच्या लढतीत बाला रफिक शेखने हिंद केसरी युद्धवीर राणा याला अवघ्या काही सेकंदात पराभूत करत २ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 25-03-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratap gaikwad won uttar maharashtra kesari from nagar