शरद पवार हे सोलापूर जिल्ह्य़ाचा विकास करतील, हा विश्वास मनात बाळगून मागील लोकसभा निवडणुकीत आपण माघार घेतली होती. परंतु पवार यांनी कसलाही विकास न करता चक्क फसवणूक केली, अशा शब्दात काँग्रेसचे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी, पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान दिले आहे. प्रतापसिंहांनी एकाचवेळी शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढविताना काँग्रेसचे नेते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही टीकेचा भडिमार केला. काँग्रेस व राष्ट्रवादीवर एकाच वेळी टीकास्त्र सोडताना प्रतापसिंहांनी आपली आगामी वाटचाल पुन्हा एकदा भाजपच्या दिशेने असल्याचे संकेत दिले आहेत.
अकलूज येथे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पाणी परिषद तथा शेतकरी मेळाव्यात प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्यामुळे हा शेतकरी मेळावा सोलापूर जिल्ह्य़ासह पश्चिम महाराष्ट्रातील आगामी राजकारणाच्या दृष्टीने गाजला. या मेळाव्यास भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. याशिवाय भय्यू महाराज देशमुख (इंदूर), सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, जलतज्ज्ञ अनिल पाटील, पाणी प्रश्नाचे अभ्यासक डॉ. डी.एल. मोरे आदींची उपस्थिती होती.
सोलापूर जिल्ह्य़ावर पवार काका-पुतण्याकडून सातत्याने अन्याय केला जात असून आपापसात भांडणे लावून या काका-पुतण्यांनी जिल्ह्य़ाची वाट लावली आहे. स्थानिक भीषण पाणी प्रश्नावर जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे आमदार बोलायला तयार नाहीत. कारण त्यांना पवार काका-पुतण्याची भीती आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प गुंडाळणारे पवार काका-पुतणे आता या प्रकल्पावर चर्चाही करू नये म्हणून डाफरतात. एवढेच नव्हे तर उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याची मागणी करू नका म्हणून दरडावत येथील आमदारांचा  आवाज दाबतात. हा अन्याय आपण सहन करणार नाही, अशा इशारा प्रतापसिंह मोहिते-पाटील देतात.
आमदार देवेंद्र फडणवीस यांनीही या व्यासपीठावर कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करताना शरद पवार व अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना शासनाने बासनात गुंडाळली असताना दुसरीकडे मराठवाडय़ाला उजनी धरणातून २१ टीएमसी पाणी नेण्यासाठी सातशे कोटींचा निधी खर्च केला. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे पाणीच उजनी धरणात येणार नसेल, तर मराठवाडय़ात उजनीचे पाणी नेण्याचे पुढचे काम कशासाठी केले, असा सवाल आमदार फडणवीस केला. हा शेतकरी मेळावा बराच गाजला असून त्यातून जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे बंधू असलेले प्रतापसिंह हे बंडखोर प्रवृत्तीचे आहेत. त्यांनी यापूर्वी १९९६-९७ साली युती शासनाच्या काळात काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. त्याचवेळी  सातारचे राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील भाजपमध्ये गेले होते. प्रतापसिंहांना राज्यमंत्रिपद मिळाले. नंतर युतीची सत्ता गेली. तेव्हा प्रतापसिंह भाजपमध्येच राहिले. दरम्यान, २००३ साली सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने प्रतापसिंह यांना उमेदवारी दिली. यात काँग्रेसचे माजी मंत्री आनंदराव देवकते यांना पराभूत करून प्रतापसिंह हे खासदार झाले. परंतु नंतर ते भाजपमध्ये जास्त काळ रमले नाहीत. त्यांनी काँग्रेसची वाट धरली व विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी मिळविली. तथापि, अलीकडे जिल्ह्य़ातील बदलत्या राजकीय समीकरणाच्या पाश्र्वभूमीवर प्रतापसिंह यांची अस्वस्थता वाढत गेली आणि दुष्काळाच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्य़ावर होत असलेला अन्याय तथा सापत्नभावाची वागणूक यामुळे त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांची आगामी राजकीय वाटचाल भाजपच्या दिशेने राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे अनेकांची पंचायत होणार असल्याचे दिसून येते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा