भेटी लागी जीवा लागलीसे आस.. आषाढी एकादशी दोन दिवसांवर आलेली असल्याने वारकरी व भाविकांना विट्ठल-रुख्मिनीच्या दर्शनाची ओढ लागली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा व शेगावला आषाढी एकादशीच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांसाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.
विदर्भातील भाविकांसाठी धापेवाडा हे प्रतिपंढरपूर आहे.आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीला वारकऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या विट्ठल-रुख्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य न झालेले भाविक धापेवाडा, शेगाव अशा ठिकाणी वारी करतात. येत्या शुक्रवारी आषाढी एकादशी असल्याने वारकरी खांद्यावर पताका घेऊन धापेवाडा व शेगावला दर्शनासाठी निघाले आहेत. धापेवाडा येथे आषाढी एकादशी आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असे दोन दिवस भाविक दर्शनासाठी येणार असल्याने वारकरी व भाविकांची ग्रामपंचायत, शाळा आणि गावातील कोलबा स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी आदी मठांमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. धापेवाडय़ाला मध्यप्रदेशातील सौंसर, छिंदवाडा येथून तर विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, यवतमाळ आदी जिल्ह्य़ांमधून ५० ते ६० दिंडय़ा दाखल होणार आहेत. चंद्रभागेच्या तीरावर दिंडय़ांमधून विट्ठल नामाचा गजर होणार आहे. यावर्षी वरुणराज्याच्या कृपेने धापेवाडय़ाच्या चंद्रभागा नदीला चांगले पाणी असल्याने भाविकांना पवित्रस्नानही करता येईल. धापेवाडा येथे आषाढीला पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होते, परंतु अलीकडच्या काही वर्षांपासून या परंपरेला बगल दिली जात असल्याने आमदार सुनील केदार यांच्या हस्तेच दरवर्षी महापूजा होत आहे. शुक्रवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विदर्भातील विविध ठिकाणच्या विट्ठल मंदिरांमध्ये कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शेगाव येथे गजानन महाराज संस्थामध्ये आषाढीच्या निमित्ताने भजन, कीर्तन, पालखी आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
५५ वर्षांपासून वारी
गोपाल नगरातील विट्ठल मंदिरात नित्यनेमाने भजन, हरिपाठ म्हणणाऱ्या विमल शेंदरे गेल्या ५५ वर्षांपासून धापेवाडय़ाची वारी करीत आहेत. भक्ताला आकर्षित करण्याची दैवी शक्ती पांडुरंगाच्या मूर्तीत आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तहान-भूक विसरून भाविक टाळ, मृदंग आणि वीणेच्या गजरात भक्त विट्ठलाच्या भक्तीत एकरूप होतात.  मानसाच्या सुखाचा परमोच्च बिंदू गाठून देणाऱ्या वारीतून आनंद मिळत आहे, असे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा