ग्रामीण भागात शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक देवाण-घेवाणी संबंधात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने स्पेनमधील सँटीएगो विद्यापीठाशी सांमजस्य करार केला आहे. या करारामुळे प्रवरेतील विद्यार्थ्यांना युरोपातील शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
युरोपियन कमिशन प्रोग्रामचे संयोजक प्रा. डॉ. जॉकाबो फियेस आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी जनरल राजेंद्र विखे यांनी या करारावर आज सह्या केल्या. संस्थेचे सचिव डॉ. संपतराव वाळुंज, अतिरिक्त सचिव डॉ. लक्ष्मीप्रसन्ना, सहसचिव डॉ. जयसिंगराव भोर आदी यावेळी उपस्थित होते. युरोपातील या विद्यापीठाला पाचशे वर्षांची वैभवशाली परंपरा आहे.
डॉ. जॉकाबो फियेस यांनी या दरम्यान प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इतर शैक्षणिक संस्थांनाही भेटी दिल्या. जगात पाचव्या स्थानावर असलेल्या सँटीएगो डी कम्पोस्टेला या विद्यपीठाने ८० देशातील १ हजार विद्यापीठांशी अशाच प्रकारचा सहकार्य करार केला आहे. या करारामुळे सुमारे ४०० संशोधक निर्माण होवून त्यांच्या ज्ञानाचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबरच संशोधक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वानाच होणार आहे. संशोधनासाठी निवड झालेल्यांना या विद्यापीठात एक ते तीन वर्षांपर्यंत रहाता येईल. पदवीसाठी प्रती महिना १ हजार युरो, पदव्युत्तर संशोधनासाठी १ हजार ५०० युरो, पोस्ट डॉक्टरेटसाठी १ हजार ८०० युरो, तर विभागासाठी २ हजार ५०० युरो शिष्यवृत्ती मिळणार असून, जाणे-येणे व राहाण्याच्या खर्चासह आरोग्य विम्याबरोबरच तेथील सर्व सुविधांचा फायदा मिळणार आहे. आरोग्य तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र, विज्ञान अशा सर्वच विषयांत या विद्यपीठात संधी मिळणार असल्याने भारतातील पारंपारिक शाखेच्या विद्यार्थ्यांनाही येथे शिकण्यासाठी संधी मिळणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे, विश्वस्त तथा राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे हे शिक्षणात क्षेत्रातील नवनवीन बदलाची ग्रामीण भागातील मुलांनाही संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने प्रयत्नशील असून शिक्षणाची कवाडे समाजातील सर्वच स्तरावर पोहोचावित आणि बदलत्या शैक्षणिक संधीचा फायदा सर्वाना मिळावा या उद्देशाने परदेशात मिळणारे शिक्षण प्रवरेतील विद्यार्थ्यांनाही मिळावे हाच यामागचा हेतू आहे. याचाच एक भाग म्हणून युरोपियन विद्यापीठाशी झालेल्या या कराराचा ग्रामीण भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना खऱ्या अर्थाने लाभ होऊ शकेल.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था केवळ या विद्यापीठाशीच शैक्षणिक सहकार्य करार करणार नाहीत तर युरोपातील जवळपास इतर नऊ विद्यपीठांच्या सहकार्य करारात सहभागी होणार आहे. संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील महाविद्यलयातील प्रा. डॉ. अनिल कुऱ्हे हे यापुर्वी एक पोस्ट डॉक्टरेट पुर्ण करण्यासाठी या विद्यापीठात एक वर्ष कार्यरत होते. या विद्यापीठाने त्यांना वरीष्ठ कार्यक्रमाचे भारतातील अ‍ॅम्बेसिडर म्हणून जबाबदारी दिली आहे. तीन स्तरावर विद्यार्थ्यांची या विद्यापीठाशी शिक्षण आणि संशोधनासाठी निवड करण्यात येणार आहे. पहिल्या गटात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सहभागी होणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांला येथे प्रवेश मिळेल. दुसऱ्या गटात संस्थेबाहेरील विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात येईल. तिसऱ्या गटात अनुसुचित जाती, जमाती मधील विद्यार्थ्यांना संधी मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.