पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या शिफारशीवरून पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २००८ मध्येच प्रकल्पग्रस्त म्हणून आम्हाला नोकरीत घेतल्याची माहिती २० कामगारांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात कामगारांनी म्हटले आहे, की निळवंडे धरणाच्या प्रकल्पात आमच्या जमिनी गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त म्हणून २००७ मध्ये १० आणि २००८ मध्ये १० अशा २० धरणग्रस्तांना विखे पाटील कारखान्याने सेवेत रुजू करून घेतले आहे. निळवंडे धरणाच्या पाण्यावरून सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपात धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित करून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांना लक्ष्य केले जात आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनात त्यांचे कोणतेच योगदान नसल्याच्या आरोपांचे या कामगारांनी खंडन केले आहे. पालकमंत्री मधुकर पिचड यांनी कोणतीच शहानिशा न करता राजकीय हेतूने केलेल्या आरोपांमुळे आमच्या नोकऱ्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीतीही या कामगारांनी पत्रकात व्यक्त केली आहे. विखे कारखान्याच्या नोकरीमुळेच आमचे संसार फुलले आहेत असेही या कामगारांनी म्हटले आहे.

Story img Loader