दुपारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने करवीरकरांना चांगलाच दिलासा दिला. प्रचंड उष्म्यामुळे कासावीस झालेल्या नागरिकांना पावसाचा सुखद गारवा मिळाला. शहर व परिसरात तसेच जिल्ह्याच्या पूर्वभागात चांगला पाऊस झाला.
आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. यामुळे नागरिक हैराण झाले होते. वळवाचा पाऊस जोरदार पडेल अशी अपेक्षा होती. मात्र वळवाचा पाऊस अधूनमधून येत गेल्याने उन्हाची लाही कमी झाली होती.
आज सकाळपासूनच हवेतील उष्मा वाढला होता. त्यामुळे दिवसभरात पाऊस येणार याचा अंदाज नागरिकांनी बांधला होता. दुपारी आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरभर पाणी साचले होते. जिल्ह्याच्या पूर्वभागातील हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी या भागातही चांगला पाऊस झाला.
ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आला आहे. पाऊस पडणार याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला आहे. पेरणीच्या वेळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. या आठवडय़ात चांगला पाऊस होईल अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा