सोलापूर शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागत असून शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यांसह काही भागात पाऊस बरसला. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना आता चांगलाच दिलासा मिळाला आहे. काल गुरूवारी रात्री उशिरा तब्बल ३६.४ मिलीमीटर एवढा समाधानकारक पाऊस झाल्याने दुष्काळी भागातील आशा पल्लवित झाल्या आहेत.
काल रात्री नऊनंतर पावसाला प्रारंभ झाला. जोरदार स्वरूपात पडलेल्या या पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले होते. या जलमय रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक दुचाकी वाहने बंद पडली होती. विशेषत: जुना एम्प्लॉयमेंट चौक, हरिभाई देवकरण प्रशाला, शिवछत्रपती, रंगभवन, होटगी रोड, रामलाल चौक, भैय्या चौक, चौपाड, पांजरापोळ चौक व अन्य भागातील रस्त्यांवर पाणी निचरण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्याठिकाणी पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात साचले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
तत्पूर्वी, दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावून सर्वाना आनंद दिला होता. त्यावेळी रात्री पडलेल्या पावसाची नोंद ९.६ मिमी इतकी झाली होती. त्यानंतर काल दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा चांगलाच पाऊस झाला. यात तब्बल ३६.४ मिमी इतका मोठा पाऊस झाल्याने साहजिकच सर्वाना दिलासा मिळाला. या पावसामुळे सोलापूरच्या तापमानात आणखी घट होऊन ते ३८.५ अंश सेल्सियसपर्यंत खाली आल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Story img Loader