स्वच्छ, सुंदर नगरे वसविण्याची संकल्पना महाराष्ट्राच्या पारदर्शी शासनाची आहे. तळागाळातील लोकांच्या हाताना काम देण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिकीकरणावर भर देणे सुरू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
नगर परिषदेच्या प्रशासकीय भवनाचा, तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्य़रुग्ण विभागाच्या इमारतीचा लोकार्पण सोहोळा मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात वर्धा जिल्हा पालकमंत्री राजेंद्र मुळक, राज्यमंत्री रणजीत कांबळे, खासदार दत्ता मेघे, जिल्हाधिकारी संजय भागवत प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, गांधींच्या वास्तव्यामुळे पुनीत झालेल्या या जिल्ह्य़ाचे नाव जगाच्या नकाशावर झळकले आहे म्हणून गांधींच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची जबाबदारी या जिल्ह्य़ातील लोकांची आहे. महाराष्ट्रातील ५० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यांना शुद्ध पाणी मिळावे, त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था व्हावी, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, नागरी रस्ते, हातांना काम या सर्व समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विदर्भात भरपूर प्रमाणात जागा, पाणी, मनुष्यबळ उपलब्ध आहे. याचा विचार करून विदर्भ औद्योगिक राज्य करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अनेक उद्योग समूह आता विदर्भाकडे वळू लागले. त्यामुळे त्यांना उद्योग उभारणीत ज्या ज्या सवलती म्हणून देण्यात येतील त्या देण्याचा प्रयत्न आहे. आम्ही औद्योगिकरणाचे १८,४०० सामंजस्य करार नुकतेच केले.
राज्यात अनेक भागात दुष्काळ आहे; परंतु विदर्भात मात्र पाणी मुबलक आहे. शासनाने विदर्भातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी पैसे खर्ची घातले, परंतु दुर्दैवाने योजना पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पोहोचले नाही. प्रलंबित योजना पूर्ण करण्यासाठी केंद्राने निधी द्यावा. आरोग्य योजनांच्या सेवाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी एक बृहद् आराखडा तयार करणे सुरू असून २००० ठिकाणी नवीन स्वास्थ्य केंद्रे उभी करून आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुलगावच्या विकासासाठी वैशिष्टय़पूर्ण निधीतून निश्चितच निधी देऊ असेही, चव्हाण यांनी शेवटी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले.
याप्रसंगी पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी राजीव गांधी जीवनदायी योजना संपूर्ण राज्यात लागू करावी, अशी मागणी करून नगरोत्थान योजनेंतर्गत समस्या सोडवू, असे सांगून कल्पक नेतृत्व असणारे रणजीत कांबळे व दयावान नेतृत्व असणारे खासदार दत्ता मेघे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. या कार्यक्रमात कांबळे यांनी या शहरातील उड्डाण पुलाची समस्या, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, रुग्णालयाचा दर्जा वाढविणे इत्यादी मागण्यांचा पाढा वाचला, तर सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी म्हणाले की, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ घेता येईल. यापुढे राज्यात कुणासही शल्यक्रियेसाठी, रक्तासाठी व रुग्णवाहिकेसाठी पैसे मोजावे लागणार नाही. यापुढे आरोग्यसाठी कोणाकडेही भीक मागायची नाही. यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आरोग्य विभागातील १२०० रिक्त पदे २ ते ३ महिन्यात भरू, असे शेट्टी म्हणाले.
प्रास्ताविक मुख्याधिकारी टाकरखेडे यांनी केले. या कार्यक्रमात मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन नगराध्यक्ष भगवान ठाकूर, उपाध्यक्ष सुनील ब्राम्हणकर, बांधकाम सभापती मनीष शाहू, सभापती प्रमोद घालणी यांनी सत्कार केला. प्रसंगी मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय भवनाची प्रतिकृती भेट देण्यात आली. तसेच पालिकेने दुष्काळग्रस्त निधीसाठी १ लाख रुपयांचा धनादेश व शिक्षक संघाने २१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना प्रदान केला. प्रशासकीय इमारतीचे काम अल्पावधीत पूर्ण केल्याबद्दल कंत्राटदार मन्नान बोहरा यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल वानखेडे यांनी, तर नगरसेविका स्मिता चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमापूर्वी भाजपने या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व राज्यमंत्र्यांना अनेक प्रश्नांवर सवाल करणाऱ्या खुल्या पत्राचे वाटप केले. या पत्रकात तहसीलचा प्रश्न, पाणी समस्या, बेरोजगाराची समस्या याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. नगर परिषदेअंतर्गत गावातून कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडीवाल्यांनी आम्हास वेतन वाढवा व भविष्य निर्वाह निधी कपात करा, असे निवेदन दिले.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिकीकरणावर भर -मुख्यमंत्री
स्वच्छ, सुंदर नगरे वसविण्याची संकल्पना महाराष्ट्राच्या पारदर्शी शासनाची आहे. तळागाळातील लोकांच्या हाताना काम देण्यासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी औद्योगिकीकरणावर भर देणे सुरू आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
First published on: 09-03-2013 at 03:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preasure to industrial development in every taluka chief minister