नवे महापौर संग्राम जगताप यांनी गुरुवारी प्रथमच घेतलेल्या महापालिकेच्या आढावा बैठकीत पिण्याच्या पाण्याची योजना, नगरोत्थानची कामे आणि सावेडीतील नियोजित नाटय़गृहाच्या कामाला प्राधान्य देण्यात आले. ही कामे तातडीने सुरू करून वेळेत ती पूर्ण करण्याचे आदेश आमदार अरुण जगताप यांनी दिले. नगरोत्थान योजनेतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांबाबत पहिल्याच बैठकीत त्यांनी संबंधितांना धारेवर धरले.
संग्राम जगताप यांनी आजच मनपाच्या कामकाजाला प्रारंभ केला. या बैठकीस आयुक्त विजय कुलकर्णी, उपमहापौर सुवर्णा जगताप, उपायुक्त महेशकुमार डोईफोडे, राष्ट्रवादीचे गटनेते समद खान, नगरसेवक सुनील कोतकर, सविता कराळे, आरीफ शेख, नगररचनाकार विश्वनाथ दहे, मुख्य लेखाधिकारी शेलार, शहर अभियंता नंदकुमार मगर, यंत्र अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.
प्रदीर्घ काळ चाललेल्या या बैठकीत केडगाव पाणीपुरवठा योजना (टप्पा-१), शहर पाणीपुरवठा योजना (टप्पा-२), भुयारी गटार योजना, नगरोत्थान योजना, सावेडीचे नाटय़गृह आणि घनकचरा व्यवस्थापन या कामांचा आढावा घेण्यात आला. कुलकर्णी व डोईफोडे यांनी याबाबतची माहिती दिली. शहर आणि केडगाव पाणीपुरवठा योजनेची अनेक कामे प्रलंबित आहेत. प्रामुख्याने जलवाहिन्यांची कामे सुरूच झालेली नाही. ती तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी तांत्रिक अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याची सूचना अरुण जगताप यांनी केली. सार्वजनिक बांधकाम व वीज वितरण कंपनीच्या अखत्यारीतील कामांसाठी जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांची मदत घेऊ, जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळवू असे आश्वासन त्यांनी दिले.
नगरोत्थानमधील कोठी ते यश पॅलेस, बालिकाश्रम, केडगाव देवी आणि वन विभाग ते शाह दर्गा या रस्त्यांची कामे रखडल्याबद्दल जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करतानाच तातडीने ही कामे पूर्ण करण्याची सक्त ताकीदही त्यांनी दिली. येत्या मार्चपूर्वी ही कामे पूर्ण झाली पाहिजेत असे ते म्हणाले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा