पोलीस म्हटले की एक कठोर व्यक्ती समोर उभी राहते, पण या खाकी वर्दीतील माणसामध्ये भावनिक ओलावा असल्याचा प्रत्ययही येतो.. याच भावनिक ओलाव्याचा प्रत्यय सोमवारी दुपारी आला अन् अशा सतर्क पोलिसांच्या मदतीमुळेच एक गर्भवती महिला व तिच्या बाळाचे प्राण वाचले.
जया किसन पवार (वय २०, रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर) असे त्या महिलेचे नाव! जया या कचरावेचक अहेत. त्या व पती किसन हे दररोज रेल्वेने पुण्यात कचरा वेचण्यासाठी येतात. जया गर्भवती होती. नेहमीप्रमाणे दोघेही सोमवारी कचरा वेचण्यासाठी पुण्यात आले होते. दुपारी तीनच्या सुमारास रास्ता पेठेतील मित्रा सायकलमार्ट जवळ असलेल्या कचरा पेटीत भंगार गोळा करत असताना जयाला असह्य़ वेदना सुरू झाल्या. त्या रस्त्याच्या कडेला पडून आरडा-ओरडा करत होत्या. त्यावेळी मुख्यालयातील पोलीस शिपाई केतन लोखंडे हे त्या ठिकाणाहून जात होते. त्यांनी जया यांना पाहून तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस नियंत्रण कक्षात असलेले दीपक बनसोडे यांनी माहिती घेऊन सहायक पोलीस निरीक्षक वजीर शेख यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ समर्थ पोलीस ठाण्याला वायरलेसवरून माहिती दिली. ही माहिती मिळताच सहायक फौजदार ए. टी. खोत व महिला कर्मचारी निर्मला गबाले यांनी पोलिसांची मोटार घेऊन त्या ठिकाणी गेले. मात्र, मोटारीत बसविणे शक्य नसल्यामुळे त्यांनी तत्काळ रिक्षा करून जया यांना ससून रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात नेत असताना रिक्षातच जया प्रसुत झाल्या. खोत यांनी ससून रुग्णालयात घटनेची अगोदर माहिती दिल्यामुळे येथील कर्मचारी खाली हजर होते. त्यांना तत्काळ वॉर्ड क्रमांक २३ मध्ये दाखल करण्यात आले. जया यांना मुलगा झाला असून दोघांची परिस्थती उत्तम असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत नियंत्रण कक्षाचे सहायक पोलीस आयुक्त उमराव बांगर यांनी सांगितले की, या घटनेतून पोलिसांची सामाजिक बांधिलकी जपली आहे. नागरिकांना काही अडचण असेल किंवा महत्त्वाची माहिती द्यायची असल्यास पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. यामुळे नागरिकांना तातडीने मदत करणे शक्य होईल.

Story img Loader