‘स्वाइन फ्लू’ची पावसात सुरू झालेली साथ लक्षात घेऊन मुंबईत गर्भवतींकरिता तातडीची लसटोचणी मोहीम राबविण्यात येणार आहे. बुधवारपासून या मोफत लसटोचणी मोहिमेला सुरुवात होणार असून त्यामुळे ७० टक्के स्त्रियांमध्ये प्रतिकारक्षमता तयार होण्याचा अंदाज आहे. तिसऱ्या टप्प्यातील गर्भवतींना स्वाइन फ्लूची मोफत लस दिली जाणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यात सात शहरांमध्ये ही लस मोफत दिली जाणार होती. परंतु मुंबईतील स्वाइन फ्लूची साथ लक्षात घेऊन शहरात तातडीने मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्वाइन फ्लूचे विषाणू पावसानंतर तसेच हिवाळ्यानंतर अधिक वेगाने वाढतात. त्यामुळे ऑक्टोबर किंवा फेब्रुवारीत स्वाइन फ्लूची साथ येते. यावर्षीही फेब्रुवारीमध्ये स्वाइन फ्लूची साथ आली. मात्र मेमध्ये कमी झालेली साथ मुंबईत पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. जुलैमध्ये आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या दीडशेहून अधिक रुग्णांची नोंद व पाच मृत्यू झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने गर्भवतींसाठी मोफत लस उपलब्ध करून दिली आहे.
गर्भवती महिला, वृद्ध, दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण तसेच लहान मुलांमध्ये स्वाइन फ्लूमुळे गुंतागुंतीची स्थिती निर्माण होते. स्वाइन फ्लूपासून धोका असलेल्या सर्वाना लस देण्याची शिफारस ‘महाराष्ट्र साथरोग प्रतिबंधक आणि नियंत्रण तांत्रिक समिती’ने केली होती. मात्र आतापर्यंत मोफत लशींसाठी फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. फेब्रुवारीत स्वाइन फ्लूची साथ आल्यावर राज्याच्या आरोग्य विभागाकडून डॉक्टर, परिचारिकांसाठी तीन हजार डोस पाठवण्यात आले होते. त्यातील फक्त २३०० वापरण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सुरुवातीला केवळ गर्भवती महिलांना ही लस देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यातही बदल करून आता गर्भारपणाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सहा महिने पूर्ण झालेल्या गर्भवतींसाठी ही लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात यासंबंधी डॉक्टर व परिचारिकांना मार्गदर्शन केले जाईल व त्यानंतर बुधवारपासून ही लस उपलब्ध होईल.
‘स्वाइन फ्लू’च्या साथीमुळे मुंबईत गर्भवतींना तातडीने लसटोचणी
‘स्वाइन फ्लू’ची पावसात सुरू झालेली साथ लक्षात घेऊन मुंबईत गर्भवतींकरिता तातडीची लसटोचणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-07-2015 at 07:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant womens vaccine due to swine flu threat