आपल्या खलनायकी भूमिकांनी रुपेरी पडद्यावर गाजलेले ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आता थेट स्वातंत्र्यसेनानी आणि काँग्रेसच्या नेत्याची भूमिका साकारणार आहेत. ‘जय जवान जय किसान’ असे या हिंदी चित्रपटाचे नाव असून देशाची अधिकृत भाषा हिंदी असावी या चळवळीचे प्रणेते तसेच स्वातंत्र्यसेनानी आणि पन्नासच्या दशकात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत यांची व्यक्तिरेखा प्रेम चोप्रा साकारणार आहेत.
लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ हा नारा दिला होता. त्या घोषणेला अनुसरून मीलन अजमेरा हे चित्रपट बनविणार आहेत. गोविंद वल्लभ पंत हे स्वातंत्र्य चळवळीतील महनीय व्यक्ती असून आदर्शवादी नेते होते. शहीद या चित्रपटाच्या प्रदर्शनप्रसंगी लाल बहादूर शास्त्रीजी आले होते. त्या वेळी त्यांनी मनोज कुमार यांना ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेवर आधारित चित्रपट काढण्याबद्दल विचारले होते. त्यानंतरच मनोज कुमार यांनी ‘उपकार’ चित्रपट बनविला, अशी आठवणही प्रेम चोप्रा यांनी सांगितली.  
‘जय जवान जय किसान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मीलन अजमेरा करणार असून मदन लाल खुराणा, सीमा चक्रवर्ती, सुरजित सिंग सग्गू या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
लाल बहादूर शास्त्री यांची भूमिका भोपाळचा अभिनेता अखिलेश जैन साकारणार आहे, अशी माहितीही प्रेम चोप्रा यांनी दिली. अभिनेते ओम पुरी हे डॉ. राजेंद्र प्रसाद यांची तर राज्यलक्ष्मी पंडित यांची व्यक्तिरेखा रती अग्निहोत्री साकारणार आहेत. चंद्रशेखर आझाद यांची व्यक्तिरेखा जतीन खुराणा तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका ऋषी भुतानी साकारणार आहेत.

Story img Loader