कारखाना हा सभासद व कामगारांची लक्ष्मी आहे. तो सुरळीत चालावा, या साठी कामगारांनी कामकाजात सहभाग नोंदवावा. तसेच सभासदांनी आपले नातेवाईक, कर्मचारी व मित्रमंडळींना कामावर येण्याबाबत आवाहन करावे. येणाऱ्या खरिपाच्या पेरणीपूर्वी ३०० रुपयांचे ऊसबिल देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याच्या अध्यक्षा आनंदीदेवी राजेनिंबाळकर, उपाध्यक्ष रमाकांत टेकाळे, सतीश सोमाणी, उद्धव मडके, सुरेखा दंडनाईक, बाळासाहेब माकोडे आदींची उपस्थिती होती. राजेनिंबाळकर म्हणाले की, कारखाना ताब्यात घेतल्यानंतर शेतकरी व कर्मचाऱ्यांचे हित समोर ठेवूनच काम केले. काही विघ्नसंतोषी मंडळींनी अडचणी आणल्या. त्यामुळे ऊसबिल देण्यास उशीर झाला, या बाबत आपण दिलगीर आहोत. विरोधकांनी कारखाना अवसायानात काढून बंद पाडण्यास शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचा कुटिल डाव सर्व सभासद व कामगारांनी हाणून पाडला. विरोधकांची खेळी व कारखान्याची वस्तुस्थिती सभासदांना ठाऊक आहे. त्यामुळेच व्यवहारात त्यांनी आजवर पाठिंबा दिला आहे, असेही राजेनिंबाळकर यांनी सांगितले. जिल्हा बँक कलम ११ मध्ये अडकल्यानंतर कारखान्याचे गहाणखत करून देण्याचे काम आपण केले. बँक वाचावी, या उद्देशानेच कारखान्याची मशिनरी व जमीन बँकेकडे गहाणखत करून दिले. बँकेची काळजी असणाऱ्या तत्कालीन संचालक मंडळाने हे केले नाही. उर्वरित ३३० रुपयांचा हप्ता देण्यास आपण कटिबद्ध आहोत, असे त्यांनी सांगितले. अप्पासाहेब पाटील, चतुर्भुज जायभाये, रमेश रणदिवे, बिभीषण काळे, उद्धव समुद्रे, राजेसाहेब पाटील, चंद्रप्रकाश जमाले, पांडुरंग कुंभार, सविता कोरे यांच्यासह शेतकरी सभासद उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा