ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असून, त्यांच्या वजनात शुक्रवारी तब्बल दोन किलोने वाढ झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तसेच हजारे यांच्या प्रकृतीची काळजी घेणाऱ्या पथकाचे प्रमुख डॉ. पोपट सोनवणे यांनी सांगितले.
हजारे यांची तब्येत पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असून, त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी सकाळी वैद्यकीय पथकाने हजारे यांची तपासणी केली. त्यांच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा होत असून, अजूनही अण्णा नारळपाणी तसेच फळांचा रस घेत आहेत. आंदोलन काळात हजारे यांचे वजन सव्वापाच किलोने घटले होते. शुक्रवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्या वेळी त्यांचे वजन दोन किलोने वाढल्याचे आढळून आले. हलका आहार घेण्यासही अण्णांनी अद्याप सुरुवात केली नाही. हजारे हिंद स्वराज टस्टच्या सात नंबर खोलीत वास्तव्यास असून वैद्यकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त तेथे इतर कोणासही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे हजारे यांना भेटण्यासाठी देशभरातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या भेटीविनाच परतावे लागत आहे. सध्या राज्यातील विविध शाळांच्या सहलीही राळेगण सिद्घीत येत आहेत. अण्णांची भेट होत नसल्याने विद्यार्थीही हिरमुसल्याचे पाहावयास मिळत आहे.
रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयातील फोन सारखा खणखणत असून, हजारे यांनी मिळविलेल्या या ऐतिहासिक यशबद्दल देशभरातील मान्यवरांकडून तसेच सामान्य नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षांव होत असल्याचे अण्णांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी सांगितले. बरखास्त करण्यात आलेल्या ‘टीम अण्णा’चे सदस्य जस्टिस संतोष हेगडे यांनी कार्यालयाशी संपर्क करून आंदोलनास मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी तसेच पर्यावरणवादी कार्यकर्ते विश्वंभर चौधरी हे हजारे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी राळेगणमधून परतले. हे तिघेही दररोज दूरध्वनी करून हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत आहेत.
 जनआंदोलनाचे कार्यालय तसेच सर्व यंत्रणा आंदोलन काळात संत यादवबाबा मंदिरात हलविण्यात आली होती. आता ही यंत्रणा पुन्हा मूळ कार्यालयात आणण्यात आली आहे. कार्यालयात आंदोलनकाळात विविध ग्रामपंचायती, संघटना, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या महानगरपालिका तसेच नागरिकांनी वैयक्तिकरीत्या दिलेल्या तब्बल पोतेभर निवेदनांची छाननी करण्यात येत आहे.
राळेगणकर कामात व्यस्त
आंदोलनकाळात राळेगण सिद्घीचे नागरिक घरचे तसेच शेतीची कामे सोडून आंदोलनासाठी आलेल्या नागरिकांच्या दिमतीला हजर होते. नऊ दिवस खोळंबलेली कामे उरकण्याची ग्रामस्थांची आता लगबग सुरू असून, अण्णांनी मिळविलेल्या ऐतिहासिक यशामुळे ग्रामस्थांमध्ये खुशीचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा