प्रशासनात, राजकारणात व समाजकारणात काम करताना माणुसकी जपत कधी दुजाभाव केला नाही. कायम लोकात राहताना, सामान्यातील सामान्याच्या हितासाठी दक्ष राहिलो. त्यामुळे जनतेच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी सदैव राहिल्या आणि याचीच फलश्रुती म्हणून आपली सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्याचे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
सिक्कीम राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल श्रीनिवास पाटील हे आज कर्मभूमी कराडच्या दौऱ्यावर आले असता त्यांचा विविध संस्था व रयत संघटनेच्या वतीने खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमाचे संयोजक कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण, कराड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलतात्या जाधव, जयसिंगराव पाटील, संपतराव इंगवले, शिवाजीराव जाधव, जगन्नाथ मोहिते, सारंग पाटील, आर. डी. थोरात आदी मान्यवरांची उपस्थिती होती. रयत संघटनेतर्फे आमदार उंडाळकरांच्या हस्ते श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
आपण दिलेल्या टाळय़ांचा प्रतिसाद हा माझ्यासाठी प्रेमाचा वर्षांव असल्याचे समाधान व्यक्त करून श्रीनिवास पाटील म्हणाले, की आपण आजवर दिलेल्या भरभरून शुभेच्छांच्या बळावर सिक्कीम या राज्याचा कारभार पाहण्याची संधी मिळाली आहे. या संधीचे निश्चितच अप्रुप वाटत आहे. देशाच संरक्षण करण्याचे अन् संस्कृती विचार जपण्याचे बळ येऊ द्या. आपण पाठबळ दिलं, प्रेम, माया दिली त्यातून उतराई होईन असा विश्वास त्यांनी दिला.
उंडाळकर म्हणाले, की श्रीनिवास पाटील आता शासकीय वा राजकीय राहिले नसून, ते भौगोलिक महत्त्व लाभलेल्या सिक्कीम या चीनच्या सीमेलगतच्या राज्याच्या राज्याचे प्रमुख अन् सर्वेसर्वा म्हणावे लागतील. ते आता समाजातील सर्वच घटकांचे झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर राज्यपाल पदाचा काटेरी मुकुट असून, सिक्कीममध्ये लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता वृध्दिंगत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. श्रीनिवासजी आणि त्यांचे गुरू बळकट असल्यानेच श्रीनिवास पाटील हे प्रशासनातून पायउतार होताच लोकसभेची आणि आत्ता राज्यपालपदाची पायरी चढून आहेत. दरम्यान, श्रीनिवास पाटील यांच्याकडे खासदारकी नव्हती, पद नव्हते, परंतु ते गप्प बसले नाहीत, लोकांत राहिले, लोकांत मिसळले, समाजाला मानवतेचा खरा चेहरा देण्याचे कार्य साधले. त्यामुळेच यशवंत विचाराच्या पाटील यांना ही संधी मिळाली आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे पक्ष असतात पण संसदीय लोकशाहीत संवाद महत्त्वाचा असून, सत्ता डोक्यात गेली की काहींना भान रहात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. श्रीनिवास पाटील यांनी दिल्लीत त्यांच्याकडे येणाऱ्याला कधी त्याचा पक्ष विचारला नाही. प्रशासकीय सेवा व खासदारकीचा समाजहितासाठी उत्तम उपयोग केला. जनतेचे मूलभूत व जिव्हाळय़ाचे प्रश्न त्यांनी सोडविले.
प्रास्ताविक जगन्नाथ मोहिते यांनी केले. पहिलवान शिवाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात तालुक्यातील विविध सेवाभावी संस्था, पक्षसंघटना तसेच व्यक्तींनी श्रीनिवास पाटील यांचा सत्कार केला. त्यांना शुभेच्छा दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा