पोलीस विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दक्षिण-मध्य-क्षेत्र सांस्कृतिक संचालक रवींद्र सिंघल यांच्यासहीत शहर पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुनील कोल्हे आणि नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस निरीक्षक महेश सवाई या तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही पदके जाहीर करण्यात आली.
१९९६ च्या तुकडीचे आयपीएस असलेले डॉ. रवींद्र सिंघल यांच्याकडे सध्या दक्षिण- मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक म्हणून जबाबदारी असली तरी यापूर्वी त्यांनी नागपूरला गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सांगलीला त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अमरावती मुख्यालय आणि अमरावती शहरात उपायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर नाशिक, धुळे, नांदेड आणि लोहमार्ग पोलीस (नागपूर) दलाचे अधीक्षक होते. नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आलेला गुरु दा गद्दीसोहळा त्यांच्या कार्यकाळात झाला. याच सोहळ्याच्या बंदोबस्तावर त्यांनी शोधनिबंध लिहिल्यानंतर त्यांना पीएच.डी मिळाली. २००३ मध्ये नाशिकला झालेल्या कुंभ मेळाव्याच्या बंदोबस्तातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी सिंघल शहर गुन्हे शाखेचे प्रमुख होते. सध्या केंद्राचे संचालक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी असून गेल्या दीड वर्षांच्या काळात त्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले. केंद्रामध्ये अनेक योजना आणून त्यांनी केंद्राचा कायापालट केला. अनेक लोककलावंताना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
 सुनील कोल्हे १९९२ च्या तुकडीचे अधिकारी असून गडचिरोलीमध्ये अहेरी पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्दीला सुरूवात झाली. त्यानंतर पंढरपूरला उपअधीक्षक म्हणून तीन वर्ष होते. दोन वर्ष बारामती आणि उस्मानाबादला अधीक्षक होते.धुळे आणि सिंधूदुर्गमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले असून सध्या नागपूरला मुख्यालयात त्यांच्यावर उपायुक्त म्हणून जबाबदारी आहे. महेश सवई सध्या नक्षल विरोधी अभियानमध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रतापनगर, लकडगंजमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम बघितले आहे.  राष्ट्रपती पदक जाहीर होताच डॉ. रवींद्र सिंघल आणि सुनील कोल्हे यांनी पोलीस विभागात केलेल्या कामाची पावती मिळाली, अशी प्रतिक्रिया ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा