पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचविले
कळवा येथील चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी ठाण्यात येणार आहेत. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामुळे नवी मुंबई, कळवा, ठाणे या शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक थांबवावी लागणार असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी प्रवाशांचा मार्ग सुखकर व्हावा यासाठी काही पर्यायी मार्ग सुचविले असून राष्ट्रपतींसाठी आखण्यात आलेल्या दौऱ्याच्या मार्गाऐवजी वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रपतींचे हॅलिकॉप्टर ऐरोलीतील पटणी मैदानावर उतरेल. त्यानंतर तब्बल तासभर ते ठाणे परिसरात असणार आहेत. या काळात ऐरोली ते विटावादरम्यानची वाहतूक बंद असणार आहे. या काळात बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांना पर्याय मार्गावर प्रवासाची कसरत करावी लागणार आहे.
कळवा येथे ऊभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येत्या शनिवारी ठाण्यात येणार आहेत. यानिमित्ताने ठाण्यातील पोलीस परेड मैदानात राष्ट्रपतींची जाहीर सभा होणार असून या दोन कार्यक्रमांच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. ऐरोली येथील पटणी मैदानात राष्ट्रपतींसाठी खास हॅलिपॅड तयार करण्यात आले असून तेथून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. ठाणे-बेलापूर रस्त्यावरील मुकुंद रेल्वे ब्रीज, सूर्यानगर, विटावा जकात नाका, कळवा चौक, क्रिक नाका, उर्जिता हॉटेल, पोलीस परेड ग्राउण्ड अशा मार्गे राष्ट्रपतींचा ताफा नेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान नवी मुंबई, ठाणे मार्गावर ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची चिन्हे असून त्यामुळे पोलिसांनी काही पर्यायी मार्ग प्रवाशांना सुचविले आहेत.
पर्यायी मार्ग..
राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान नवी मुंबईतून ठाणे-बेलापूर रस्त्यावरून विटावा जकात नाका मार्गे येणाऱ्या ठाणे, कळवाकडे येणाऱ्या वाहनांसाठी ऐरोली-मुलुंड-आनंदनगर हा पर्यायी मार्ग सुचविण्यात आला असून या पर्यायी मार्गामुळे ऐरोली शहराला दुभाजून जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे. साकेतमार्गे कळव्याकडे जाणाऱ्या वाहनांनी गोल्डन डाईज नाका- कॅडबरी-नितीन कंपनी-आनंदनगर मार्गे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ठाणे शहरातील पारसिक रेती बंदर-खारेगाव-मनीषानगर मार्गे कळवा चौकात येणाऱ्या वाहनांनी मनीषानगर-खारेगाव-पारसिक रेतीबंदर-खारेगाव टोलनाका मार्गे जावे, असे पर्याय वाहतूक शाखेने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुचविले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे पर्याय सुचविण्यात आले असले तरी पर्यायी मार्गावर पडणाऱ्या वाहनांचा भार कसा हलका करता येईल, या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस सूत्रांनी दिली.