दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाईची झळ प्रत्येक नागरिकाला पोहाचत असतानाच यंदा नवरात्रोत्सव आयोजित करणाऱ्या मंडळानांही याची मोठा फटका बसला आहे. कॅमेरापासून ते मंडपापर्यंत प्रत्येक गोष्टीच्या दरात ४० ते ५० टक्क्य़ांनी वाढ झाल्याने मंडळांचे बजेट चांगलेच कोलमडले आहे. अनेक छोटय़ा मंडळांनी तर यंदा नवरोत्रोत्सव छोटेखानी स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवरात्रौत्सव म्हटले की, मंडपापासून सुरूवात होते आणि बजेटमध्ये असेल तर ते व्हिडीओ शुटिंगपर्यंत येऊन थांबते. हे सर्व करण्यासाठी यंदा छोटय़ातील छोटय़ा मंडळाला किमान पाच लाखांचे बजेट उभे करावे लागणार आहे. हाच खर्च मागील वर्षी दोन ते तीन लाखांच्या घरात होता. महागाईचा फटका छोटय़ा मंडळांना बसला असून यामुळे अनेक मंडळांनी यंदा नवरात्रोत्सव छोटखानी स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर अनेक जुन्या आणि पारंपरिक मंडळांनी आपल्या मंडळाचे बजेट वाढल्यामुळे जाहिरातींचे दर वाढवले आहेत. अधिकाधिक जाहिराती मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. परंतु जाहिरातींनाही अल्प प्रतिसाद असल्यामुळे अनेकांना मोठी काळजी पडली आहे.
मंडपवाल्यांनीही आपल्या दरात २५ टक्क्य़ांनी वाढ केली आहे तर छायाचित्रीकरण आणि ध्वनिचित्रफितीकरणाच्या दरांमध्ये ३० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. कॅमेरांचे प्रकारही अत्याधुनिक झाल्याने हे दर वाढले आहेत, अशी माहिती कॅमेरामन श्रीकृष्ण सावंत यांनी दिली. तर साऊंड सिस्टिमचे दरही मोठय़ाप्रमाणावर वाढले असून यामध्ये २० टक्के वाढ झाली आहे. ही वाढ दरवर्षी होतच असते. उत्सवाचा काळ असला की साऊंडचे दर हे जास्तच असतात. यातच यंदा महागाई वाढल्यामुळे आम्हाला दहा दिवस एक साऊंड सिस्टिम पूर्णपणे एकाच ठिकाणी ठेवणे हे कठीण जाते आणि यामुळेच आम्ही दर वाढवतो. हा व्यवसायाचा भाग असून नेहमीची मंडळे आम्हाला सहकार्य करत असतात अशी माहिती सांताक्रूझ येथील बाबू साऊंडवाला यांने दिली. याशिवाय या काळात आपल्याला दिसणारे नावीन्यपूर्ण कपडय़ांचे मार्केटही यंदा तेजीत असून याचेही दर मोठय़ाप्रमाणावर वाढले आहेत. या सर्वाच्या विरूद्ध परिस्थिती भाडे तत्त्वावर कपडे देणाऱ्यांची आहे. दांडियाला वेळेचे बंधन लागू झाल्यापसून अनेकांनी भाडे त्तत्वावर कपडे घेणे बंद केले आहे. पूर्वी आमच्या दुकानात लाइल लावून लोक भाडे तत्त्वावर कपडे घेत असे. मात्र आता हे प्रमाण खूपच कमी झाले आहे असे लालबाग येथील मयुरेश ड्रेसवाला सांगतो. यंदाच्या नवरात्रीला खर्चाची चांगलीच फोडणी लागली असून आयोजकांच्या डोळय़ातून पाणी आणले आहे.

Story img Loader