विदर्भासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये झालेली अतिवृष्टी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण आणि सणासुदीचे दिवस असल्याने मागणीत झालेली वाढ या कारणांमुळे विविध प्रकारच्या डाळींचे भाव आकाशाला टेकले असून महागाईत होरपळत असलेल्या सामान्य कुटुंबांचे जीणे आणखी कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत प्राधान्यक्रमावर असलेली डाळ खरेदी करणे आता आवाक्यापलीकडे होऊ लागले असून नागरिक या परिस्थितीसाठी सरकारला दोष देत आहेत.
अतिवृष्टीचा मोठा फटका वाहतूक व्यवसायाला बसला आहे. पावसामुळे मालाची ने-आण करणारे ट्रक वाहतूकदार यात सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. डाळ उत्पादित करणाऱ्या प्रदेशातून येणारे ट्रक रस्ते बंद असल्याने ठोक विक्रेत्यांकडे प्रचंड विलंबाने पोहोचत आहेत. परिणामी किरकोळ बाजारात डाळीच्या पुरवठय़ावर परिणाम झाला असून व्यापाऱ्यांना किंमती वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सतत होत असलेला पाऊस डाळीच्या किंमती वधारण्यात प्रमुख भूमिका बजावत आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर आल्याने जमिनी खरडून गेल्या आहेत. डाळीचे पीक जर नष्ट झाले तर भाव आकाशाला टेकतील, याची दाट शक्यता आहे. अतिपावसामुळे शेतकरी सतत चिंतेत वावरत आहे. त्याला पिके हातची जाण्याचा घोर लागला आहे. यंदा बहुतांश पीक हाती येण्याची शक्यता नसल्याने मालाची टंचाई उत्पन्न होऊन महागाई पेटण्याची शक्यता असल्याचे ठोक धान्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असल्याने आयातीत मालाच्या किमती वाढल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात १ लाख ५७ हजार टन डाळींचे उत्पान होते. परंतु, वार्षिक गरज २ लाख १० हजार टनांची भासते. त्यामुळे डाळ आयात करणे भाग पडत आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे देशात २५ ते ३० लाख टन डाळीचा तुटवडा निर्माण होण्याची भीती सद्यस्थितीत निर्माण झाली आहे.
भारत सरकार कॅनडा, बर्मा, टांझानिया, ऑस्ट्रेलिया आणि चीनमधून डाळ आयात करते. विदेशी विनिमय आता महागडा ठरू लागल्याने डाळींच्या किमतीतील वाढ अपरिहार्य असल्याचे एका व्यापाऱ्याने स्पष्ट केले.
बेभरवशाच्या वातावरणामुळे हिरवा वाटाणा सर्वात महाग झाला आहे. न्यूझीलंडमधून याची आयात केली जाते. परंतु, यंदा न्यूझीलंडमध्येही उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटल्याचे वृत्त आहे. गेल्या दीड महिन्याची आकडेवारी पाहिल्यास प्रती क्विंटलमागे डाळीच्या किमती किमान ५०० रुपयांनी वाढल्या आहेत. सध्या चणा डाळ ३८०० ते ४३००, चणा ३२०० ते ३३००, आयातीत तूर डाळ ४१०० ते ४२००, गावरानी तूर ६३०० ते ६६००, मसूर डाळ ५१०० ते ५३००, मूंग डाळ ७ हजार ते ७६००, उडद डाळ ५ हजार ते ५२०० आणि वाटाणा ३३०० ते ३३५० रुपये अशी स्थिती आहे.
सणावाराचे दिवस आल्याने डाळींची मागणी वाढणार असून त्यामुळे किंमतही १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गणपती, दुर्गोत्सव, दिवाळी आणि दसऱ्याच्या काळात यात मोठी वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
डाळ खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर
विदर्भासह देशाच्या अनेक राज्यांमध्ये झालेली अतिवृष्टी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण आणि सणासुदीचे दिवस असल्याने मागणीत झालेली वाढ या कारणांमुळे विविध
First published on: 23-08-2013 at 09:02 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price increase of pulses