गरुड.. मिकी माऊस.. विमान.. धोबी.. वटवाघूळ.. अशा विविध ढंगातील रंगीबेरंगी पतंगांनी मकरसंक्रांतीला आकाश व्यापून जाणार आहे. यंदा नायलॉन मांजा विक्रीवर कठोर र्निबध आणत काही विक्रेत्यांवर कारवाई झाल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. चायनीज पतंगांवर विक्रेता व ग्राहकांनी बहिष्कार घातल्याने पूर्वापार चालत आलेल्या धोबी, येवला पतंगासह प्लास्टिकच्या पतंगांना विशेष पसंती लाभत आहे. दुसरीकडे दरवाढीमुळे अनेकांनी तिळाच्या लाडूला पर्याय म्हणून साखर हलवा, तिळाची पोळी आदी पर्याय स्वीकारले आहेत.
आबालवृद्धांसह बच्चे कंपनीची पतंग व मांजा खरेदीसाठी सध्या रविवार कारंजा, घनकर लेन, कानडे मारुती व भद्रकाली परिसरातील प्रमुख दुकानांवर चांगलीच गर्दी उसळली. दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पतंग विक्रेता संघटनेच्या सहकार्याने नायलॉन धाग्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला, परंतु काही विक्रेते त्याची सर्रास विक्री करत असल्याचे गेल्या काही दिवसांत टाकलेल्या छाप्यात स्पष्ट झाले.
नायलॉन धाग्याचे वाढते प्रस्थ, त्यामुळे होणाऱ्या दुखापती पाहता हा धागा बाजारातून बाद करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आग्रही आहेत. कारवाईमुळे प्रमुख बाजारात तो दृष्टिपथास पडला नाही. नानाविध ढंगातील पतंग सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. विमानाच्या आकारातील चिनी पतंग, बलून आकारातील पतंग, मोठय़ा आकारातील गरुड, घुबड, सापाच्या आकारातील विविध चिनी पतंगही बाजारात दाखल झाले आहेत. मात्र मोजक्याच ग्राहकांकडून त्यांना पसंती मिळत आहे. विशेष करून बरेली, धोबी, येवला या कागदी पतंगांची चलती आहे. बच्चे कंपनीची आवड लक्षात घेता प्लास्टिकच्या पतंगावर छोटा भीम, छोटा हनुमान, बार्बी, डोरोमन असे कार्टुन्स लावण्यात आले आहेत. बाजारात सर्वसाधारणपणे दोन रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत कागदी पतंग आणि कापडी पतंग ५०० ते १००० रुपयांपर्यंत विक्रीस आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पतंगाच्या किमतीत १०-२० टक्के वाढ झाली असली, तरी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. पतंगप्रेमींकडून पांडा धाग्याला चांगली मागणी आहे. १४० ते २७५ रुपये रीळ असा त्याचा दर आहे. बरेली धागा साधारणत: १०० ते १५० रुपये रीळ, मैदानी १४० ते २०० रुपये रीळ आहे. मांज्याचे दर सहा तारी, नऊ तारी व बारा तारी यावरून ठरतात. पांडा प्रकारातील ‘फरिदबेग’ या ३५० ते ४०० रुपये असा दर असणाऱ्या मांज्याला ग्राहकांकडून पसंती मिळाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.मकरसंक्रांत उत्सव साजरा करताना नायलॉन मांज्यामुळे अनेक अपघात होतात. त्यामुळे निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक असणारे पक्षी जखमी होण्याचे प्रकार घडतात. त्यात काही वेळा त्यांना जीवही गमवावा लागतो. पतंग उडविण्यासाठी खुल्या मैदानाचा वापर करणे गरजेचे आहे. गच्चीवरून पतंग उडवू नये, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. मांज्यात अडकून अनेक पक्षी जखमी होतात व काही दगावतातदेखील. जखमी पक्ष्यांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी म्हणून नागरिकांनी पक्षीप्रेमी अथवा नजीकच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पतंगांच्या किमतीची ‘भरारी’
गरुड.. मिकी माऊस.. विमान.. धोबी.. वटवाघूळ.. अशा विविध ढंगातील रंगीबेरंगी पतंगांनी मकरसंक्रांतीला आकाश व्यापून जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-01-2015 at 07:25 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price of kites in nashik