संक्रांतीच्या सणाला तिळाएवढी माया व गुळाएवढी गोडी ठेवा, असे आवाहन करण्याची पंरपरा असली तरी महागाईमुळे पारंपरिक सण साजरे कसे करायचे? असा पेच सामान्यांना पडत आहे.  महागाईमुळे सामान्यांचा जीव तीळ तीळ तुटत आहे. संक्रांत म्हटली की घरोघरी तिळाचे लाडू केले जातात. आठ दिवसांवर मकर संक्रांत आली असून तिळाचे लाडू आणि वडय़ा करण्यासाठी बाजारात तीळ आणि गूळ खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येत आहे.  
दरवर्षी महागाईचा आलेख चढत्या भाजणीने वाढतो आहे. चांगल्या प्रतीच्या तिळाचा भाव २४० रुपये किलो, साखर ३२ ते ३५ रुपये तर गूळ ५० चे ६० रुपये किलो आहे. तिळाच्या तयार लाडूची किंमत ३५० रुपये किलो व हलवा ७५ ते ८० रुपये किलो आहे. सध्या बाजारात लाल तीळ २४० रुपये किलो तर पांढरा तीळ २२० रुपये किलो प्रमाणे विक्रीला आहे. परंपरा खंडित करता येत नाही. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात सण साजरा करण्याची पद्धत चालू आहे. नववधूंना माहेरी बोलावून संक्रांतीची साडीचोळी व चुडा दिला जातो. चुडा वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी प्रथा म्हणून त्याचा वापर संक्रांतीच्या दिवशी केला जातो. शहरातील महाल, इतवारी, गोकळपेठ, सक्करदरा, प्रतापनगर, सीताबर्डी या बाजारपेठेत संक्रांतीला लागणारे सामान विक्रीला आले असून महिलांनी वस्तूंची खरेदी सुरू  केली आहे.
घरोघरी हळदीकुंकवासाठी नातेवाईक, शेजाऱ्यांना बोलावून तीळ गुळासोबत एखादी वस्तू लुटायची पद्धत असल्यामुळे अशा वस्तूंचे नवे प्रकार दरवर्षी बाजारात येतात. महागाईच्या नावाने कितीही बोटे मोडली जात असली तरी संक्रांतीच्या बाजाराची उलाढाल ही कोटय़वधींची होते. संक्रांतीला बोराचे महत्त्व असल्यामुळे त्याची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असते. बाजारपेठेत यावर्षी बोराची आवक कमी झाली असल्याचे दिसून येत आहे. पेवंदी बोर ४० रुपये किलोप्रमाणे तर साधे बोर ३० रुपये किलोप्रमाणे बाजारात उपलब्ध आहेत. संक्रांतीला घरोघरी लुटण्याच्या वस्तू खरेदी करून ती बाजारात आणण्याची प्रक्रिया चार-चार महिने आधीपासून सुरू असते. प्रत्येक गावापयर्ंत अशा वस्तू पोहोचतात. जो तो आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार या वस्तू खरेदी करीत असतो. गेल्या काही वर्षांपासून काही महिला मंडळांनी सामूहिक हळदीकुंकू सुरू करून त्यात गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, शालेय साहित्य, परीक्षेचे शुल्क भरणे अशा प्रकारची मदत देण्याची प्रथा सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा