राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले. प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हास्तरावरील आपसी बदल्यांचा शासन निर्णय करून राज्यातील शिक्षकांना दिलासा दिल्याबद्दल सतेज पाटील यांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला.    
प्रशासकीय बदलीने, पदोन्नतीने अथवा नवीन नेमणूक या कारणांमुळे बाहेरच्या तालुक्यात सेवा करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना ५ एप्रिल २०१३ च्या शासन निर्णयानुसार स्वतच्या तालुक्यात कधीच बदलून येता येणार नव्हते. स्वतच्या तालुक्यात येता यावे यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हास्तरावरील आंतर-तालुका विनंती बदल्या व कबुली (आपसी) बदल्या होण्यासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना प्रतिनिधी ९ एप्रिल रोजी मुंबई येथे सतेज पाटील व ग्रामविकासाचे उपसचिव दत्तात्रय बोऱ्हाडे यांच्या समवेत चर्चा करून विनंती बदल्या व कबुली बदल्या होणे आवश्यक असल्याचे पटवून दिले होते.
या वेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष भिवाजी काटकर, जिल्हा सरचिटणीस रवी शेंडे, राज्य कार्यकारी सचिव कृष्णात धनवडे, दत्तात्रय एकशिंगे आदी उपस्थित होते.

Story img Loader