सावनेरच्या हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेने खोटा आरोप केलेल्या प्राचार्य वीरेंद्र केशव जुमडे यांची प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
६ फेब्रुवारी २०११ रोजी महाविद्यालयात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून प्रा. वंदना बावनकुळेसह इतर प्राध्यापिकाही कार्यालयात हजर होत्या. यादरम्यान प्राचार्य कार्यालयात आले आणि त्यांनी हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रा. बावनकुळे यांनी केला होता. आरोपपत्रानुसार प्राचार्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी सावनेरच्या प्रथम श्रेणी नायदंडाधिकारी आशीष आयचित यांच्यासमक्ष झाली. फिर्यादीच्या कुटुंबातील पाच सदस्य गेल्या १५ वर्षांपासून या महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नव्हती.
जुमडे यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर महाविद्यालयात शिस्त लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. जुमडे यांना फसवण्यासाठी विनयभंगाचा खोटा आरोप करण्यात आल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता. सर्व साक्षी पुरावे तपासल्यावर केलेला युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने प्राचार्य वीरेंद्र जुमडे यांची निर्दोष सुटका केली. प्राचार्य जुमडे यांच्या वतीने अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांनी बाजू मांडली. प्राध्यापिकेने ही तक्रार महिला आयोग आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडेही केली आहे. न्यायालयाच्या निकालाने आपल्याला दिलासा मिळाला असून हा निकाल विद्यापीठाची तक्रार निवारण समिती व महिला आयोगासमोर ठेवण्यात येणार आहे.

Story img Loader