तालुक्यातील अनसिंग येथील पद्मप्रभ दिगंबर जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदित्यकुमार वाळली यांच्या पुनर्नियुक्तीचा आदेश अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक राम पवार यांनी २७ फेब्रुवारीला रद्द केला आहे.
अनसिंग येथील प.दि. जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदित्यकुमार वाळली ३१ डिसेंबर २०१२ ला सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी त्यांचा २०१२-१३ शैक्षणिक सत्र (३० एप्रिल २०१३ पर्यंत) संपेपर्यंत मुख्याध्यापक पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव येथील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे ८ जानेवारीला पाठवला होता. त्या प्रस्तावावर स्याद्वाद  एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष धर्मचंद्र कुंडलसा वाळली यांच्या स्वाक्षरीऐवजी संस्थेचे ऑडिटर बालचंद वाळली यांनी अध्यक्ष म्हणून स्वाक्षरी केली होती.
याबाबत संस्थेच्या अध्यक्षांनी वाशीमच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे तक्रार दाखल करून मुख्याध्यापकाच्या पुनर्नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानेही मुख्याध्यापक आदित्यकुमार वाळली हे कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीचे पालन करत नाहीत व कर्मचाऱ्यांना त्रास देतात याबाबत वरिष्ठांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार मुख्याध्यापकाची पुनर्नियुक्ती विभागीय शिक्षण उपसंचालकांनी २८ जानेवारीला रद्द केली होती.
मुख्याध्यापक आदित्यकुमार वाळली यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे प.दि. जैन विद्यालयातील शिक्षक बबन ठाकरे यांचा स्थगित केलेला घरभाडे भत्ता अदा करण्याबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीबाबत शासनाचे आदेश पाळण्याची लेखी हमी दिल्यामुळे त्यांनी २० फेब्रुवारीला मुख्याध्यापकाला पुनर्नियुक्तीस परवानगी दिली होती.
या पुनर्नियुक्तीबाबत संस्थेच्या अध्यक्षांनी पुन्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे आपला आक्षेप नोंदविला होता. अध्यक्षांनी त्यांच्या तक्रारीत मुख्याध्यापक आदित्यकुमार वाळली हे संस्थेचे सचिव असून त्यांनी अनेक गैरप्रकार केले असून सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असून संस्था वादांकित असल्याचे नमूद केले होते. अध्यक्षांच्या तक्रारीवरून प.दि. जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदित्यकुमार वाळली यांचा मुख्याध्यापकाच्या पुनर्नियुक्तीचा आदेश २७ फेब्रुवारीला रद्द केला आहे. विभागीय शिक्षण उपसंचालकाच्या या आदेशाने जिल्ह्य़ातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाल्याचे वृत्त आहे.