इलेक्ट्रॉनिक माध्यमांची संख्या वाढत असली, तरी मुद्रित माध्यमे म्हणजे वृत्तपत्रांचे महत्त्व मात्र काय आहे, असे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या जालना जिल्हा शाखेचे सहसचिव अॅड. डी. के. कुलकर्णी यांनी आज येथे सांगितले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जालना जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहायक एन. आर. इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अॅड. कुलकर्णी म्हणाले, की इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या भाऊगर्दीत वर्तमानपत्रांवर वैचारिक आणि समाज प्रबोधनाच्या लिखाणाची जबाबदारी असून ती पार पाडण्याचे काम मुद्रित माध्यमे करीत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही वृत्तपत्रांचे महत्त्व समाजात कायम राहिलेले आहे. वृत्तपत्रांतील वैचारिक आणि विश्लेषणात्मक लिखाणामुळे समाजात सकारात्मक आणि चांगले बदल होऊ शकतात. पूर्वीच्या काळात वृत्तपत्रांसाठी आजच्यासारखे अनुकूल असे तांत्रिक वातावरण नव्हते. पूर्वीच्या काळात इ-मेल, इंटरनेट, फॅक्स इत्यादी सुविधा नव्हत्या. माहितीही आताच्या सारखी सहज उपलब्ध होत नसे. परंतु त्या काळातही वर्तमानपत्रे प्रतिकूल परिस्थितही समाजाच्या हिताचे लिखाण करीत असत. पूर्वी आणि आजही वृत्तपत्रे समाजहिताचे प्रश्न हिरिरीने मांडीत आहेत.
अॅड. कुलकर्णी म्हणाले, की २००५ मध्ये माहिती अधिकाराचा कायदा आला. त्यापूर्वी शासकीय कामकाजाच्या अनुषंगाने जनतेस वर्तमानपत्रांच्या माध्यमातून माहिती मिळत असे. समाजातील चांगल्या आणि वाईट या दोन्हीही बदलांच्या संदर्भात माध्यमांचे स्थान महत्त्वाचे असते. एखाद्या व्यक्तीची चांगली अथवा वाईट प्रतिमा निर्माण करण्यात माध्यमांचे योगदान महत्त्वाचे असते. प्रतिकूल घटनांचे अनुकूल सादरीकरण करण्याचे कामही कधी-कधी माध्यमे करीत असल्याचेही आपण पाहत असतो. माध्यमांनी समाजाच्या हिताच्या संदर्भात आपली भूमिका ठेवणे आवश्यक असते, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना इनामदार यांनी पत्रकार आणि महिती कार्यालयाचे नाते अतूट असल्याचे सांगितले. जालना जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष अंकुशराव देशमुख यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा