चुनाभट्टी येथे सेवा निवासस्थानाच्या इमारती न बांधताच मुद्रण कामगारांना बेघर करून अंधेरी पश्चिमेच्या चार बंगला परिसरातील मुद्रण कामगार नगर गिळंकृत करण्याचा घाट विकासकाने घातला आहे. कामगारांना घराच्या बदल्यात घर देण्याऐवजी पाच-दहा लाख रुपये देऊन राहती घरे रिकामी करून घेण्यासाठी विकासकाचे प्रयत्न सुरू असून छप्पर हरवण्याच्या भीतीने धास्तावलेले कामगार आता याविरुद्ध दाद मागण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे धाव घेणार आहेत.
महसूल विभागाने १९६२ मध्ये अंधेरी, चार बंगला येथील २० एकराचा भूखंड मुद्रण कामगारांची वसाहत उभारण्याकरिता उद्योग आणि कामगार विभागाच्या ताब्यात दिला. या भूखंडावरील साडेचार एकर जागेवर मुद्रण कामगारांसाठी १२ इमारती बांधण्यात आल्या. मुद्रण कामगार या वसाहतीमध्ये वास्तव्यास गेले. दरम्यानच्या काळात २० एकर भूखंडावरील काही जागा ज्ञान         केंद्र, आयएएस-आयपीएस  अधिकाऱ्यांची पाटलीपुत्र गृहनिर्माण संस्था, मुक्ती फाऊंडेशन, आमदार वसाहत, नौशाद फाऊंडेशन, डॉ. नीतू मांडके रुग्णालय व कामधेनू व्यापारी संकुल यांना देण्यात आली. राज्य सरकारने २००८ मध्ये मुद्रण कामगारांच्या वसाहतीच्या जागेवर उद्योग भवन बांधण्याचा आणि मुद्रण कामगारांसाठी चुनाभट्टी येथे तीन इमारती बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २००९ मध्ये विकासकाची नियुक्ती करून त्याला कार्यादेश देण्यात आले. चुनाभट्टी येथे २४० सदनिकांच्या तीन इमारती २४ महिन्यांमध्ये बांधून मुद्रण कामगारांचे पुनर्वसन करावे आणि २५ व्या महिन्यामध्ये अंधेरीमधील मुद्रण कामगार वसाहतीच्या जागेचा विकास करावा, असे शासन निर्णयात स्पष्ट म्हटले होते. मुद्रण कामगारांसाठी चुनाभट्टी येथे घरे बांधून देण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०१३ रोजी संपुष्टात येत आहे. पण चुनाभट्टीला इमारती उभ्याच राहिलेल्या नसल्याने मुद्रण कामगार अंधेरीचे घर सोडण्यास तयार नाहीत. तरीही ही घरे कामगारांनी कोणत्याही परिस्थितीत रिकामी करावीत, यासाठी पाच-दहा लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात येत असल्याचा आरोप मुद्रण कामगार नगर रहिवासी संघाने केला          आहे.

Story img Loader