गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक व निसर्गसंपन्न जिल्हा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी धान उत्पादकता वाढविण्यासोबतच तो नगदी पिकाकडे वळला पाहिजे. त्यांची आíथक स्थिती सुधारण्यासोबतच जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येतील आणि त्या माध्यमातून स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याला आपले प्राधान्य राहील, असे मत नवनियुक्त जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
मावळते जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांच्याकडून जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते गुरुवारी बोलत होते. २००६ च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आय.ए.एस.) अधिकारी असलेले सूर्यवंशी यांनी औद्योगिक विकास महामंडळात सह मुख्य कार्यकारी अधिकारी, जुल २०१३ ते ऑगस्ट २०१४ मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ऑगस्ट २०१४ ते १ एप्रिल २०१५ या कालावधीत नव्यानेच निर्मिती झालेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी लोकसहभागातून आणि कंपन्यांच्या उत्तरदायित्व निधीतून ऑपरेशन कायापालट हा उपक्रम राबवून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांचे बळकटीकरण केले. तसेच एक कुटुंब एक नोकरी, हा उपक्रम राबवून पहिल्याच वर्षी १ हजार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला. पालघर जिल्ह्याची नव्यानेच निर्मिती झाल्यामुळे जिल्हा परिषदेला प्रशासक म्हणून त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. गोंदिया जिल्ह्यातील स्थानिकांना वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यावर आपला भर राहणार असून महसूल विभागाचे प्रश्न, आरोग्य विभागाचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्यात येतील.
जिल्ह्यातील विविध समस्या आपण अभ्यास करून सोडविणार आहोत. तसेच डॉ. सनी यांनी सुरू केलेले विविध उपक्रम सुरू ठेवून त्यात वाढ करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले.
कृषी व पर्यटन विकासाला प्राधान्य
गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक व निसर्गसंपन्न जिल्हा आहे.
First published on: 14-04-2015 at 07:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priority to agriculture and tourism development