शहर बस सेवेच्या दरात आता पुन्हा एकदा वाढ होणार आहे. स्थायी समितीच्या २३ नोव्हेंबरला होणाऱ्या सभेत यासह मनपाच्या विविध आस्थापनांवरील पदांच्या कराराने नियुक्तया करण्याचे विषय आहेत.
मध्यंतरी डिझेलचे, तसेच मोठय़ा गाडय़ांच्या सुटय़ा भागांचे दर बरेच वाढले. त्यामुळे शहर बस सेवेच्या दरातही १ रूपयाने वाढ करण्यात आली. ठेकेदार कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतरही स्थायी समिती तो विषय सभेसमोर घेत नव्हती. त्यामुळे ठेकेदार कंपनीला अखेर सेवा थांबवण्याचा इशारा द्यावा लागला व नंतर समितीने ही दरवाढ मंजूर केली. त्यानंतर आता पुन्हा डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दरवाढीचा प्रस्ताव ठेकेदार कंपनीने मनपाला दिला.
तो आता स्थायी समितीसमोर घेण्यात आला आहे. असा प्रस्ताव मागे ठेवला तर काय होते ते मागील वेळी लक्षात आल्याने बहुधा आता समितीकडून या दरवाढीला लगेचच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी महिला व मुलींना, तसेच वृद्धांनाही ही सेवा रिक्षा किंवा कोणत्याही खासगी वाहनांपेक्षा किफायतशीर असल्याने ती विशेषत: उपनगरात चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
या विषयासह बाळासाहेब देशपांडे दवाखान्यात भूलतज्ञ, बालरोग तज्ञ या पदावर, पाणी पुरवठा विभागात पंपचालक व वीजतंत्री या पदावर करार पद्धतीने नियुक्तया करणे, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. एन. बी. मिसाळ यांचे मानधन वाढवणे, मनपाच्या व्यापारी संकुलातील जागा भाडेतत्वावर देणे, असे काही विषय समितीच्या सभेसमोर आहेत.
मनपाच्या बांधकाम विभागात स्नेहल मुळे यांना कनिष्ठ अभियंता म्हणून करार पद्धतीने नियुक्ती देण्याचा विषयही आहे. बांधकाम विभागात दोन महिला अभियंता कार्यरत आहेत. त्यातील श्रीमती देशमुख यांचा करार अद्याप सुरू आहे, श्रीमती मुळे यांचा करार संपल्यामुळे त्यांच्या पुर्ननियुक्तीचा विषय घेण्यात आला आहे. मनपाच्या बांधकाम विभागात अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या या पहिल्याच दोन महिला आहेत.
शहर बससेवा पुन्हा महागणार
शहर बस सेवेच्या दरात आता पुन्हा एकदा वाढ होणार आहे. स्थायी समितीच्या २३ नोव्हेंबरला होणाऱ्या सभेत यासह मनपाच्या विविध आस्थापनांवरील पदांच्या कराराने नियुक्तया करण्याचे विषय आहेत. मध्यंतरी डिझेलचे, तसेच मोठय़ा गाडय़ांच्या सुटय़ा भागांचे दर बरेच वाढले.
First published on: 20-11-2012 at 03:47 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prise hike in tiket of city bus bus service will more expensive