तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. या निर्णयामुळे पीएमपीच्या तिकीट दरात प्रत्येक टप्प्यामागे एक रुपयांची वाढ होईल. या निर्णयाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर दरवाढ प्रत्यक्षात अमलात येईल. दरवाढीला लोकप्रतिनिधींनी जोरदार विरोध केला. मात्र, प्रशासनाने दरवाढ रेटून नेली. डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे तिकिटदरात वाढ करावी लागत असल्याचे पीएमपीचे म्हणणे आहे.  
पीएमपीचा दैनंदिन तोटा वाढत असून तो काही प्रमाणात भरून काढण्यासाठी तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाने तयार केला होता. हा प्रस्ताव सोमवारी संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला. नव्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्याचे पाच रुपये हे तिकीट कायम राहणार आहे. मात्र, पुढील प्रत्येक टप्प्याचे तिकीट मात्र एक रुपयांनी वाढणार आहे. पीएमपीचे किमान तिकीट आता पाच रुपये व कमाल तिकीट ३४ रुपये होईल. तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेत असताना दैनंदिन पासचा दर ७० रुपयांवरून ५० रुपये करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.  पीएमपीतर्फे विद्यार्थी, तसेच अपंग, मूकबधिर आदी घटकांसाठी मोफत पास दिला जातो. त्यासाठीचा निधी महापालिकेतर्फे पीएमपीला दिला जातो. मात्र, सवलतीचे हे सर्व पास रद्द करण्याचाही प्रशासनाचा प्रस्ताव होता. त्यालाही जोरदार विरोध झाल्यामुळे हा प्रस्ताव तूर्त पुढे ढकलण्यात आला.
पूर्णत: चुकीची दरवाढ – जगताप
प्रशासनाने ठेवलेला दरवाढीचा प्रस्ताव पूर्णत: चुकीचा असून त्याला संचालक मंडळातील सर्व लोकप्रतिनिधींनी विरोध केला. मात्र, प्रशासकीय संचालकांची संख्या जास्त असल्याने दरवाढीचा निर्णय झाला, अशी प्रतिक्रिया पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. एकीकडे ठेकेदारांचे कल्याण करणारे निर्णय प्रशासन घेत आहे आणि दुसरीकडे रोज प्रवास करणाऱ्या दहा ते बारा लाख प्रवाशांना दरवाढीचा भरुदड दिला जात आहे. संपूर्ण पीएमपीचीच रचना बदलण्याची गरज निर्माण झाली असून दरवाढीच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा