केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पुनर्वसन धोरणानुसार कोणत्याही प्रकल्पाला जर पर्याय असेल तर एक इंचही बागायत जमीन घेता येत नाही. मात्र, मुख्यमंत्री  शेकडो एकर बागायत जमीन विमानतळासाठी घेऊ पाहात आहेत. कायदा मोडणे म्हणजे गुन्हेगारी. तेव्हा तुम्ही कायदा मोडून गुन्हेगारी करू नये. हा जिल्हा क्रांतिकारकांचा आहे. तो तुमचा अन्याय सहन करणार नाही व केल्यास तुम्हाला झुकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.  
कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीतर्फे येथील लिबर्टी मैदानावर आयोजित लढा परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, जनता उद्योग समूहाचे प्रमुख विलासराव पाटील-वाठारकर, पाटणचे आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, कृती समितीचे नेते अशोकराव थोरात यांची यावेळी उपस्थिती होती.
डॉ. पाटणकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी विमानतळाच्या आकाराविषयी प्रकल्पबाधितांना सतत दीड वर्ष खोटे सांगून अंधारात ठेवण्याचे काम केले आहे. गेल्या चाळीस वर्षांत एकही मुख्यमंत्री इतके खोटे बोलेले नाहीत, परंतु हे मुख्यमंत्री कराडचे असूनही येथील जनतेला फसवत राहिले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील जनतेची माफी मागावी अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शशिकांत शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या भावना ऐकण्यासाठी येथे आलो आहोत. यामध्ये पक्षापक्षामध्ये वाद नाहीत, लढा नाही. आम्ही सर्वाना बरोबर घेऊन पर्याय काढू. हिवाळी अधिवेशनात या प्रश्नी आवाज उठवू. विमानतळाचा विस्तार भौगोलिक दृष्टीचा विचार करून घेणे गरजेचे आहे. केवळ हट्ट नको. त्यासाठी कोणाची तरी जमीन जाणार आहे. ती जाऊ नये अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेतो याचा अर्थ राष्ट्रवादीकडून विकासकामांना खो घातला जातो असा नाही.
बाळासाहेब पाटील म्हणाले की, अनेक ठिकाणची विमानतळाबाबत मागणी असल्याने त्या पर्यायांचा विचार व्हावा.  विमानतळ विस्तारीकरणात जनतेची मोठी फसवणूक सुरू असून, अनेकांच्या जमिनी जात असल्याने शेतकऱ्यांच्या विमानतळ विस्तारीकरणास विरोध आहे, तरीही हे कोणालाही विश्वासात न घेता अट्टाहासाने सुरू आहे. विलासराव वाठारकर, सत्यजितसिंह पाटणकर, अविनाश मोहिते, शोभा पाटील, आनंदराव जमाले यांची यावेळी भाषणे झाली.
मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कर्मभूमीतील विमानतळ विस्तारवाढीच्या घेतलेल्या भूमिकेला लढा परिषदेच्या माध्यमातून प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसने सरळसोट विरोध दर्शवत राज्यातील साठमारीच्या राजकारणाचा पाढा येथेही गिरवला आहे. परिणामी काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय तिढय़ाचा वाद कराडच्या विमानतळ विस्तारवाढीचा मुद्दा घेऊन चांगलाच रंगणार असल्याने मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आम्ही शेतकऱ्यांची बाजू घेतोय म्हणजे विकास कामाला खो नसून, हा पक्षापक्षातील वाद नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांच्या न्याय भूमिकेला हा जाणीवपूर्वक कितवा खो म्हणावा अशी टीका मुख्यमंत्री समर्थकांकडून केली जात आहे.   
 

Story img Loader