मारहाण केल्याच्या आरोपावरून जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिमान पवार व पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचा-यांविरुद्ध कल्पना सुधीर गायकवाड या महिलेने न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे.
 गायकवाड या गर्भवती महिलेस जिल्हा न्यायालयाच्या आवारात १२ ऑगस्टला पवार व त्यांच्या पोलीस कर्मचा-यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. भादंवि ३२३, ३५४, ३४२, १६२, २१७ सह ३४ अन्वये ही फिर्याद वसिल शिवाजी सांगळे यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे.
कायनेटिक चौकात राहणारी ही महिला न्यायालयीन दाव्याची माहिती घेण्यासाठी वकिलांना भेटण्यासाठी गेली होती, ओळखीच्या महिलेसमवेत न्यायालयाच्या आवारात चहा पीत असताना, तेथे आलेल्या विहीण व सुनेबरोबर ओळखीच्या महिलेचे भांडण झाले. गायकवाड ते भांडण सोडवत असतानाच पोलीस वाहनातून तेथे आलेल्या पवार व अनिल भारती, पोटे (पूर्ण नाव नाही) या पोलिसांनी मारहाण केली व पकडून पोलीस ठाण्यात नेले. तेथेही मारहाण करण्यात आली. गायकवाड सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यावरही पोलिसांनी तक्रार करू नये म्हणून दडपण आणले व को-या कागदावर सह्य़ा घेतल्या. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यावर त्यांनीही दडपण आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे न्यायालयात फिर्याद दाखल केल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा