आचरणातून संस्कार करणारे नेते नसल्याने समाजमूल्यांची घसरण होत चालली आहे, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. आयुष्यातील पासष्टीच्या टप्प्यावरून मागे वळून पाहताना इतरांच्या संवेदनेशी माझी संवेदना जुळवू शकलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवू शकलो, हीच आजवरच्या आयुष्याची उपलब्धी आहे, असे सांगतानाच सार्वजनिक जीवन जगताना खाजगी आयुष्याचा बळी द्यावाच लागतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकांच्या जगण्याच्या प्रश्नांशी सतत भिडणारा, गरजवंतांना वेळीच मदत करून त्यांच्या जीवनात हास्य फुलवणारा सहवेदक म्हणून गिरीश गांधी यांचे नाव विदर्भाला परिचित आहे. येत्या २३ जुलैला गिरीश गांधी यांच्या पासष्टीनिमित्त चाहत्यांनी विशेष सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, संस्कृती, पर्यावरण आणि पत्रकारिता अशा विविध प्रांतांमध्ये सहज वावरणाऱ्या गिरीश गांधींनी सध्याच्या परिस्थितीत सामजिक जीवनात वावरणे अतिशय अवघड असल्याचे सांगितले.  
राजकीय जीवनात राहून सार्वजनिक जीवनातील कामे करता येतात. अशी बाब निश्चितच अनुकरणीय आहे. अर्थात असे वागताना त्याची किंमत बरेचदा चुकवावी लागते. मात्र, यातूनच समांतर किंवा पुढील पिढीचे नेतृत्व पुढे येत असते. सार्वजनिक आयुष्यात लोकांना मदत करीत राहिलो म्हणूनच आजही माझ्याकडे माणसांचा सतत राबता असतो. माझ्याविरुद्ध काहूर उठविणाऱ्यांची स्वत:ची सामाजिक जीवनातील पत काय हे काळाच्या कसोटीवर सिद्ध होईल, असेही गिरीश गांधी म्हणाले.
व्यक्तीच्या संबंधातला प्रेमाचा सहजभाव टिकवून ठेवण्यापेक्षा औपचारिकतेलाच महत्त्व असलेल्या आजच्या जगात काही निश्चितच अपवाद आहेत. विदर्भाच्या सामाजिक जीवनात सहज वावरताना आणि चौकटीत राहून बंड पुकारताना परिवर्तनशील विद्रोही व्यक्तिमत्व म्हणून वेगळी ओळख मिळविणाऱ्या गिरीश गांधींना गांधीवाद, मार्क्‍सवाद आणि दलित पँथरचेही तेवढेच आकर्षण आहे. माणसाला जगण्याशी जोडून ठेवण्याचा त्यांच्यावरील संस्कार आजोबा आणि आईवडिलांचा आहे, या आवर्जून उल्लेख गिरीश गांधींनी केला.
अजातशत्रू म्हणविले जात असले तरी कुणी दुखावेल याची तमा न बाळगाणाऱ्या त्यांच्यातील विद्रोहाने अजातशत्रूत्व व्यक्तिमत्वावर अनेकदा मात केली आहे. अलीकडच्या प्रकाश खरात यांच्या षठय़ब्दीपूर्तीचा कार्यक्रम असो की तु.वि. गेडाम यांच्या सत्काराचा कार्यक्रम असो. जे पटत नाही ते रोखठोक सांगण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. खरातांच्या कार्यक्रमात उच्चवर्णीयांविषयी गरळ ओकणाऱ्यांना खडे बोल त्यांनी सुनावले. तेवढय़ाच तोडीने तु. वि. गेडामांच्या सोहळ्यात दलितांविषयीची असूया कशी टोकदार आहे, याचे दाखले द्यायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
या विद्रोही बाण्याबाबत छेडले असता ते म्हणाले, हा विद्रोही बाणा अलीकडचा नव्हे तर अगदी शाळेपासूनचा आहे. युवक चळवळीत सक्रिय असताना सामाजिक आणि राजकीय परिवर्तनावर निर्भीडपणे भाष्य करण्यास मागेपुढे पाहिले नाही. समग्र परिवर्तनाचा नारा देणारे जयप्रकाश नारायण जर व्यवस्थाविरोधी असतील तर इंदिरा गांधी कशा काय देशभक्त असू शकतात, असा सवाल आपण केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
लोकांनाही आजही मार्गदर्शनासाठी, स्वत:चे दु:ख व्यक्त करण्यासाठी गिरीश गांधी प्रत्येकाला जवळचे वाटतात. याचे रहस्य उलगडताना गिरीश गांधी म्हणाले, सांस्कृतिक नेते, असा उल्लेख बरेचदा होत असला तरी अशी बिरुदे मला आवडत नाहीत. मित्र जमवणे हा माझा छंद आहे कारण मित्रांशिवाय जीवन नाही. सार्वजनिक जीवनात असंख्य मित्र जोडू शकलो, याचा अभिमान आहे. त्यामुळेच जगणेदेखील तेवढेच सुसह्य़ झाले.