करवीर निवासीनी महालक्ष्मी मंदिराची सुरक्षा यंत्रणेची माहिती खासगी सुरक्षारक्षकांना दाखवण्याच्या प्रकाराविरुद्ध शिवसेनेने आवाज उठवत मोर्चा काढला. या प्रकारास जबाबदार असणाऱ्या अधिकारी, सदस्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी केली.
    बेळगाव येथील एका खासगी सुरक्षारक्षकांच्या सुमारे १०० प्रशिक्षणार्थीना महालक्ष्मी मंदिरातील सुरक्षा यंत्रणा कशाप्रकारे कार्यरत असते. याची माहिती तीन दिवसांपूर्वी देण्याती आली. महालक्ष्मी मंदिर हे अतिरेक्याच्या हिटलिस्टवर असताना मंदिराच्या सुरक्षाव्यवस्थेची अशाप्रकारे हेळसांड करण्याच्या प्रवृत्तीवर कारवाई करण्याची मागणी यापूर्वी बजरंग दल व प्रजासत्ताक संघटनेने केली होती. आता यामध्ये शिवसेनेने आपला आवाज मिसळला आहे. मंदिराच्या सुरक्षिततेला धोक्यात आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेने प्रारंभी शिवाजी चौकात निदर्शने केली. तेथून मोर्चा महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या भवानी मंडपात गेला. मंदिराच्या सुरक्षिततेमध्ये वाढ न केल्यास गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करण्याचा इशारा जिल्हा प्रमुख पवार यांनी दिला. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्ष शुभांगी साळोखे, रवी चौगुले, दिलीप पाटील, शशी बिडकर, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.