केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांवर उपनगरातील रुग्णांचा पडणारा भार हलका करण्यासाठी पालिकेशी संलग्न असलेल्या उपनगरांतील रुग्णालयांना खासगी संस्थेच्या मदतीने अतिदक्षता विभागाचे टॉनिक देण्याचा पालिकेचा मानस आहे. खासगी वैद्यकीय संस्थेच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर पाच संलग्न रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू होणार असल्याने, उपनगरांतील रुग्णांना घराजवळच उपचार मिळू शकतील.
मुंबई अथवा महाराष्ट्र नव्हे तर अन्य राज्यांतूनही अनेक रुग्ण पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येतात. परिणामी या तिन्ही रुग्णालयांतील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांवर प्रचंड कामाचा ताण पडत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तसेच पालिकेशी संलग्न असलेल्या काही रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागाची चांगली सोय नसल्याने आणि मोठय़ा रुग्णालयांतील अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे आता काही रुग्णालयांमध्ये खासगी संस्थांच्या मदतीने १० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्याचा विचार पालिका करीत आहे.
एका खासगी संस्थेची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र सध्या आचारसंहिता लागू असल्याने ती संपल्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल. पहिल्या टप्प्यात पाच रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने उपनगरांतील बहुतांश रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहेत.
पालिकेच्या संलग्न रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागाची व्यवस्था नसल्याने अनेक वेळा गंभीर आजारी रुग्णाला केईएम, शीव अथवा नायर रुग्णालयात पाठवावे लागते. मात्र तेथेही अतिदक्षता विभागात खाटा उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. खासगी रुग्णालयांतील दर परवडणारे नसतात. उपनगरातच पाच रुग्णालयांत अतिदक्षता विभाग सुरू झाल्यानंतर गंभीर आजारी रुग्णांना जीव धोक्यात घालून केईएम, शीव, नायर रुग्णालयात यावे लागणार नाही, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा