परभणी महापालिका कर्मचारी संपावर
महापालिका कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनप्रश्नी बुधवारी बेमुदत संपाचे हत्यार पाजळले. महापौर व आयुक्त यांनी दुपारी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संप मागे घेण्याबाबत चर्चा केली. मात्र, थकीत वेतनाच्या मागणीवर चर्चा थांबली. थकीत वेतन मिळेपर्यंत संप मागे घेणार नाही. अशी भूमिका घेत कर्मचारी संघटनेने संप सुरू ठेवला आहे. संपकाळातील वेतनाच्या मागणीमुळे पेच निर्माण झाल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
महापालिकेने कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वीचे वेतन अदा केले. त्यानंतर एकही पगार दिला नाही. त्यामुळे महापालिकेतील सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू करून कार्यालयासमोर धरणे धरले. संपामुळे पाणीपुरवठा व सफाई यंत्रणेवर परिणाम झाला, ही बाब लक्षात घेऊन महापौर प्रताप देशमुख व आयुक्त सुधीर शंभरकर यांनी संघटनेचे पदाधिकारी कॉ. राजन क्षीरसागर व के. के. आंधळे यांच्याशी जवळपास तीन तास चर्चा केली.
महापालिका प्रशासनाने बहुतेक मागण्यांसाठी सकारात्मक भूमिका घेतली. परंतु सर्व थकीत वेतन अदा करण्याच्या मागणीवर संघटनेचे पदाधिकारी ठाम राहिले. वेळीच तोडगा न निघाल्यास शुक्रवारी (दि. १५) शनिवार बाजार येथून महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा संपाचा परिणाम शहरातील परिस्थितीवर जाणवत होता.
संपाची जनतेला झळ बसू नये, या साठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे महापौर देशमुख यांनी सांगितले. संपकाळातील थकीत वेतन मिळावे, अशी मागणी कर्मचारी संघटनेने घेतल्याने पेच निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन दिले आहे.
तिसऱ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार देण्यात आला. त्यामुळे संपाचा पाणीपुरवठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. मागील काळात कर्मचाऱ्यांनी २३ दिवसांचा संप पुकारला होता. ते वेतन मिळण्यासाठी संघटना अडून बसल्या आहेत. आम्ही यावर विचारणा करीत आहोत. ठोस निर्देश प्राप्त होत नाहीत, तोवर संप काळाचे वेतन देता येणार नसल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
कर्मचारी-कामगारांच्या प्रश्नांवर महापालिका सकारात्मक विचार करीत असून तातडीने एक महिन्याचे वेतन, २० फेब्रुवारीनंतर आणखी वेतन व मार्चमध्ये एका महिन्याचे थकीत वेतन या पद्धतीने सर्व थकीत वेतन कर्मचाऱ्यांना अदा करण्याचा प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
कॉ. क्षीरसागर यांनी थकीत वेतनासहित अन्य मुद्दय़ांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले.

.

Story img Loader