व्यायामासाठी पोषक असलेल्या ऐन हिवाळ्यात येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम पुढील महिन्यात एका ‘बडय़ा’ राजकारण्यांच्या दबावामुळे एका महानाटय़ाच्या प्रयोगांसाठी देण्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी असताना याची कुणकुण लागल्याने स्टेडियमबाहेरच्या घडामोडींनीही वेग घेतला. क्रीडाप्रेमींनी स्टेडियम महानाटय़ाच्या प्रयोगासाठी देण्यास तीव्र विरोध दर्शविल्याने विरोधाचे हे महानाटय़ही चांगलेच रंगले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडाबाह्य कार्यक्रमांसाठी स्टेडियम देता येणार नसल्याचे नमूद केल्याने आयोजन आणि विरोधाचे महानाटय़ संपुष्टात आले आहे.
शहरातील काही जणांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमवर डिसेंबरच्या पूर्वार्धात महानाटय़ाच्या प्रयोगांचे दहा दिवसांसाठी आयोजन करण्याचा घाट घातला होता. स्टेडियम प्रयोगासाठी सहजासहजी उपलब्ध होणार नसल्याची जाणीव झाल्यानंतर एका बडय़ा नेत्याने त्यासाठी मध्यस्थी केल्याचेही सांगितले जाते. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनीही या प्रयोगांव्दारे उपलब्ध होणाऱ्या निधीचे कारण देत परवानगी देण्यास अनुकूलता दर्शविली होती.
स्टेडियमच्या देखभालीचा खर्च अधिक असल्याने आणि सध्या कोणत्याही क्रीडा स्पर्धा नसल्याने अशा कार्यक्रमांव्दारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास आर्थिक मदत होत असेल तर काय हरकत आहे, असा मुद्दा सबनीस यांनी मांडला. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावर या प्रयोगांवर शिक्कामोर्तब होईल, असेही त्यांनी नमूद केले.
परवानगीचे हे महानाटय़ एकीकडे अंतीम टप्प्यात आले असताना त्याची गंधवार्ता क्रीडाप्रेमींना लागली. महानाटय़ाच्या प्रयोगांना परवानगी मिळाल्यास स्टेडियम किमान पंधरवाडय़ासाठी नियमित होणाऱ्या खेळांच्या सरावासाठी उपलब्ध होणार नाही, याची त्यांना जाणीव झाली. शिवाय हिवाळा हा आरोग्यदायी मानला जात असल्याने खेळाडूंच्या व्यायामावरही या प्रयोगांमुळे बंधन येऊ शकते हे म्हणणे त्यांनी मांडले. महत्प्रयासाने देखणे रूप धारण करण्याकडे वाटचाल करणाऱ्या स्टेडियमची अवस्था पंधरवाडय़ात पुन्हा ‘जैसे थे’ होऊ शकते हा धोका लक्षात घेऊन क्रीडाप्रेमींनी त्याविरोधात निषेधाचा सूर व्यक्त केला. जिल्हा खो खो संघटनेचे सचिव मंदार देशमुख यांनी तर, अशा कार्यक्रमांव्दारे निधी मिळत असल्यास वर्षांतील काही दिवस त्यासाठीच राखीव ठेवण्यात यावेत असा टोला लगावला. नाशिक जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव रत्नाकर पटवर्धन हे तर प्रारंभापासूनच मैदान बचावची भूमिका मांडत आले आहेत.
निषेधाची धार तीव्र होत असतानाच जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव आपल्यापुढे अजून आला नसून क्रीडाबाह्य अशा कोणत्याच कार्यक्रमास स्टेडियम दिले जाणार नसल्याची भूमिका ‘नाशिक वृत्तान्त’कडे स्पष्ट केली. थोडय़ाशा महसुलासाठी दुसऱ्या कार्यक्रमांना स्टेडियम उपलब्ध करून दिले जाणार नाही. अशा कार्यक्रमांमुळे स्टेडियममधील धावपट्टीसह इतर सुविधांना बाधा पोहोचू शकते, याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader