महापौर, आयुक्त तक्रार करणार
महापालिकेच्या शहर पाणी योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्याचा पाणी पुरवठय़ावर अनिष्ट परिणाम होत आहे. दरमहा साधारण १ कोटी रूपयांचे वीज बील व एक्सप्रेस फिडरवरचा वीज जोड असूनही असे होत असल्यामुळे महापौर शीला शिंदे तसेच आयुक्त विजय कुलकर्णी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वीज वितरण कंपनीबाबत तक्रार करणार आहेत.
तत्पूर्वी कंपनीचे नगरचे अधीक्षक अभियंता शिवाजी चाफेकरंडे यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबत सांगण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने यासंदर्भात वीज कंपनीकडे अनेकदा निवेदन देण्यात आले, मात्र त्याची दखलच घेतली जात नसल्याचे दिसते आहे. अर्धातास वीज पुरवठा बंद झाला तरीही मुळा धरणातून होणारा पाण्याचा उपसा ठप्प होऊन पुढे पाणी योजनेची सगळी यंत्रणाच थांबते व वसंत टेकडी येथील मुख्य टाकीत अपेक्षित प्रमाणात पाणी जमा होत नाही. परिणामी शहराच्या अनेक भागांना पिण्याचे पाणी देण्यात अडचण निर्माण होते. सध्या दिवसातून किमान २ वेळा तास ते अर्धा तास वीज पुरवठा खंडित होत आहे.
मुळा धरणावरील उपसा केंद्रात मनपाचे ५ वीज पंप आहेत. विळद येथील जलशुद्धीकरण केंद्रात नव्या पंप हाऊसचे ९ व जुन्याचे ४ असे एकूण १३ पंप आहेत. वीज पंप सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडीत झाला की मुळा धरणापासूनची सगळी यंत्रणा बंद होते. त्यानंतर वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर मनपाला एक एक पंप किमान १० ते १५ मिनिटांच्या अंतराने सुरू करावे लागतात. ते पुर्ण क्षमतेने सुरू झाले की विळद येथील पंपही त्याच पद्धतीने एका नंतर एक असे सुरू करावे लागतात. असे केल्यानंतरच मुळा धरणातून उपसा झालेले पाणी व्यवस्थित दाबाने विळदला व नंतर वसंत टेकडी येथील टाकीत जमा होण्यास सुरूवात होते. या सगळ्याला अगदी सहजपणे १ तासापेक्षा जास्त अवधी लागतो.
औद्योगिक वसाहतीमधील वीज पुरवठा खंडीत होत नाही. मात्र मनपाच्या पाणी योजनेचा वीज पुरवठा मात्र नियमीत खंडीत होत आहे. त्यामुळेच याबाबत महापौर व आयुक्त मनपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वीज वितरण कंपनीच्या या पक्षपाती धोरणाच्या विरोधात तक्रार करणार आहेत.
दरम्यान मुळा धरणातील पाण्याची पातळी सध्या तरी मनपाला हवी त्याप्रमाणे १ हजार ७५४ फुटांच्या वर आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठय़ाला धोका नाही. मात्र धरणातून शेतीला किंवा अन्य कारणांसाठी एखादे आवर्तन सोडले तर मात्र ही पातळी कमी होऊन शहराच्या पाणी पुरवठय़ावर संकट येऊ शकते. त्याचप्रमाणे वसंत टेकडी येथून ग्रामीण पाणी पुरवठय़ासाठी पाण्याचे टँकर भरण्याचे प्रमाणही सध्या फार वाढले आहे. त्यामुळे टाकीत पाणी जमा होऊनही मनपाला अपेक्षेप्रमाणे पाण्याची पातळी मिळेनाशी झाली आहे.
खंडित विजेमुळे शहराच्या पाणी पुरवठयात व्यत्यय
महापालिकेच्या शहर पाणी योजनेचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्याचा पाणी पुरवठय़ावर अनिष्ट परिणाम होत आहे. दरमहा साधारण १ कोटी रूपयांचे वीज बील व एक्सप्रेस फिडरवरचा वीज जोड असूनही असे होत असल्यामुळे महापौर शीला शिंदे तसेच आयुक्त विजय कुलकर्णी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे वीज वितरण कंपनीबाबत तक्रार करणार आहेत.
First published on: 14-02-2013 at 02:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem in water supply because of load sheding