सिडको वसाहतीमधील कचऱ्याच्या समस्येमुळे नागरिक भलतेच त्रासले आहेत. प्रत्येक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कचराकुंडी भरून रस्त्यावर साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे रहिवाशांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना कचऱ्याने स्वागत करण्याची प्रथा पडली आहे. सिडकोने खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, खांदेश्वर वसाहतीमधून कचरा उचलण्याचे काम बीव्हीजी कंपनीला दिले आहे. सिडकोचे आरोग्य विभाग कचरा उचलण्याच्या कामावर नियंत्रण ठेवते. नागरिकांच्या आंदोलनाच्या पवित्र्यानंतर सिडकोचे अधिकारी मात्र बीव्हीजी कंपनीला दंड लावून वेळ मारून नेण्याची कारवाई करताना दिसत आहेत.
सिडको वसाहतीमधील रहिवाशांना कचऱ्याने ग्रासले आहे. या वसाहतींमधून दिवसाला सुमारे १५० टन कचरा एकत्र करून डंपिंग ग्राऊंडवर टाकण्याची जबाबदारी बीव्हीजी कंपनीला देण्यात आली आहे. कचराकुंडीतून बीव्हीजी कंपनीच्या गाडीत भरण्याचे काम अनेक वर्षांपासून येथील स्थानिक करतात. या कामगारांची संघटना आहे. वाढीव वेतन आणि भत्त्यासाठी हे कामगार अनेक वर्षांपासून सिडको प्रशासनाशी वाटाघाटी करत आहेत. मात्र चर्चेखेरीज कामगारांच्या हाती काहीच मिळत नाही. त्यामुळे हे कामगार अचानक कामबंदचे हत्यार उपसत आहेत. सिडकोसोबत बीव्हीजी कंपनीने केलेल्या करारामध्ये दर्शविलेल्या कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या आणि प्रत्यक्षात रस्त्यावर चालणारी वाहने यांमध्ये कधीच ताळमेळ जुळत नाही. काही महिन्यांपूर्वी एकाच क्रमांकाची दोन कचरा उचलणारी वाहने नवीन पनवेल परिसरात फिरत होती. बीव्हीजी कंपनी बडय़ा मराठी उद्योजकाची असल्याने आणि त्याला राजकीय वरदहस्त असल्याने सिडकोचे अधिकाऱ्यांचे हात कारवाईपासून तोकडे झालेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problem of waste in cidco colony