नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, कडवा व वालदेवी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला २७ हजार ६१० क्युसेक तर नगर जिल्हय़ातील मुळा धरणातून ४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, जायकवाडीच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. जायकवाडीचा पाणीसाठा २९ हजार ९०० दशलक्ष घनफुटावर गेला आहे. आता वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून पावसाने साथ दिली तर मराठवाडय़ाच्या शेतीलाही पाणी देणे शक्य होणार आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावरील संघर्षांची धार कमी होण्यास मदत होणार आहे.
जायकवाडी धरणाचा मृत पाणीसाठा २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. यंदा मृतसाठय़ातील सुमारे ६ हजार दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले. पावसाळा सुरू झाल्यानंतर १५ जुलैपर्यंत धरणातील पाणीसाठा २० हजार ९३२ दशलक्ष घनफूट होता. पण नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात यंदा चांगला पाऊस पडला. त्यामुळे गोदावरी नदीला ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे लागले. १५ जुलैनंतर जायकवाडीत नवीन पाण्याची आवक सुरू झाली. आतापर्यंत १० हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला पोहोचले आहे. जायकवाडीचा पाणीसाठा २९ हजार ९०० दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचला आहे. धरणात आता जिवंत पाणीसाठा ५ टक्के झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या ओव्हरफ्लोचे पाणी किमान एक महिनाभर व पावसाने साथ दिली तर दोन महिने जायकवाडीला चालू राहणार आहे. भंडारदरा धरण भरले असून येत्या दोन दिवसांत निळवंडे धरणही ओव्हरफ्लो झाल्यास प्रवरा नदीला पाणी सोडले जाईल. मुळा धरणात १८९०० दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुळा धरणातून मुळा नदीला ४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडीत पाण्याची चांगली आवक होत आहे तसेच पुढील दोन महिन्यांत धरणात नवीन पाण्याची चांगली आवक अपेक्षित आहे. धरणात ५६ हजार दशलक्ष घनफूट म्हणजे ३० टक्के पाणीसाठा झाल्यानंतर मराठवाडय़ाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. यंदा अपेक्षित पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर, नाशिक विरुद्ध मराठवाडा असा सुरू झालेला पाणीसंघर्ष कमी होऊ शकेल. पाण्यावरून सुरू झालेल्या कोर्टकचेरीला काही काळ विश्रांती मिळेल असे तज्ज्ञांचे मत आहे.
नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात काल मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे गोदावरीला २७ हजार ६१० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणातून ८ हजार १५५, गंगापूर धरणातून ७ हजार १३०, वालदेवी धरणातून २५० व कडवा धरणातून ४ हजार ६७४ क्युसेकने गोदावरीत पाणी सोडण्यात येत असून नांदूर मधमेश्वर बंधा-यावरून गोदावरीत २७ हजार ६१० क्युसेक एवढे पाणी वाहात आहे. गोदावरी डाव्या कालव्याला ३२० क्युसेक, उजव्या कालव्याला ४५० क्युसेक तर एक्सप्रेस कालव्याला ७०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. ७ हजार १४९ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या दारणा धरणात ५ हजार २९५ एवढा ७४ टक्के पाणीसाठा स्थिर ठेवून उर्वरित पाणी नदीत पाणी सोडले जात आहे. ५ हजार ६३० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या गंगापूर धरणात ४ हजार ६६६ म्हणजे ८२.८७ टक्के पाणी स्थिर ठेवून उर्वरित पाणी नदीत सोडले जात आहे.
नगर जिल्ह्यातील मुळा धरणात पाण्याची चांगली आवक होत असून १८ हजार ९०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. कोष्टकानुसार १७ हजार ९७६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्याने धरण भरले नसले तरी उर्वरित पाणी मुळा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडीचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. भंडारदरा व निळवंडेतूनही येत्या दोन ते चार दिवसांत प्रवरा नदीत पाणी सोडले जाईल. गोदावरी, मुळा व प्रवरा नद्यांच्या पाण्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वेगाने होईल. ऑगस्ट महिन्यात धरणाची चांगली परिस्थिती २००९ सालानंतर प्रथमच होणे अपेक्षित आहे. जायकवाडीत चांगली आवक सुरू झाल्यास प्रवरा डावा व उजवा तसेच मुळा डावा व उजवा या कालव्यांनाही पाणी सोडले जाईल. निसर्गाच्या कृपेने पाणीप्रश्नावरून सुरू झालेल्या प्रादेशिक वाद आता विझण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा