नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने विद्यमान महापौर सागर नाईक यांचा महापौर निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने महापालिकेत निर्माण झालेला पेच दूर होण्याची चिन्हे दिसू लागली असून, येत्या २६ नोव्हेंबर रोजी महापौरपदासाठी फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक स्थगित झाल्याने महापौरांच्या भूमिकेत वावरणाऱ्या नाईक यांच्या ‘काळजीवाहू’ पदालाही विरोधकांनी हरकत घेतली होती. नव्याने निवडणुका होत नाहीत तोवर कोणत्याही धोरणात्मक निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार नाईक यांना नव्हता. त्यामुळे महापालिकेत कायदेशीर पेच निर्माण झाला होता. अखेर कोकण आयुक्त विजय नहाटा यांनी महापौर निवडणुकीचा नवा कार्यक्रम जाहीर केला असून मंगळवारी (२० नोव्हेंबर) निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक भलतेच आक्रमक झाले असून महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेलाही न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे.
महापौर निवडणुकीत सर्वच उमेदवारांचे अर्ज बाद ठरल्याने ही निवडणूक स्थगित झाली होती. या पाश्र्वभूमीवर गेल्या दोन आठवडय़ांपासून महापालिकेत नवा पेच निर्माण झाला होता.
दरम्यान, ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महापौर निवडणूक प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय शिवसेना आणि काँग्रेसने घेतला असून अर्ज फेटाळताना चुकीचा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा शिवसेना नेत्यांनी कोकण आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. शिवसेनेचे उमेदवार मनोज हळदणकर हे ओबीसी राखीव मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रमाणपत्राची वैधता यापूर्वीच महापालिका तसेच कोकण आयुक्तांकडून तपासून घेण्यात आली आहे. असे असताना प्रमाणपत्र सादर केले नाही या निकषावर अर्ज फेटाळला जाऊ शकत नाही, असा दावा विरोधी पक्षनेते विजयानंद माने यांनी केला.

Story img Loader