जीवनाचा संकुचित अर्थ लावल्यानेच मनुष्याला आयुष्यात वारंवार संकटाला सामोरे जावे लागते. ही गोष्ट लक्षात घेऊनच जीवनाच्या तत्वज्ञानाचे विचारमंथन होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी येथे बोलताना व्यक्त केले.
सत्तावनाव्या अखिल भारतीय तत्वज्ञान परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हजारे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय औटी होते. पूर्णवाद वर्धिष्णू डॉ. विष्णूमहाराज पारनेरकर, अखिल भारतीय दर्शन परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. दुबे, महामंत्री डॉ. अंबिकादत्त शर्मा, विश्वविद्यालयाचे रिपूसुदन श्रीवास्तव, डॉ. एस. जी. पारळकर, प्रा़ गुलजार रजपूत, ई. आर. मठवाले, एस. एस. आबोटी आदी यावेळी उपस्थित होते.
आपले घर हेच संस्कार केंद्र असले पाहिजे असे सांगून हजारे म्हणाले, विविध विषयांवरील तत्वज्ञानाच्या परिषदांचे नेहमीच आयोजन केले जाते, तशाच प्रकारे जीवनावरील तत्वज्ञानाच्याही परिषदा आयोजित करण्याची गरज आहे. जीवनाच्या तत्वज्ञानाचा विचार न केल्यामुळे दु:ख वाटय़ाला येते त्यासाठी जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. चाणाक्ष बुद्घी वाईट कामाऐवजी सत्कार्यासाठी उपयोगात आणली तर समाजाचे भले होईल असेही ते म्हणाले. पूर्णवाद विचारांच्या माध्यमातून परिवर्तनाचा प्रयत्न होत आहे ही चांगली गोष्ट आहे. हा विचार देशपातळीवर गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संपूर्ण परिषदेदरम्यान पूर्णवादभूषण गणेश पारनेरकर यांनी आपल्या खुमासदार सूत्रसंचलनाने उपस्थितांवर छाप पाडली. प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणात त्याची दखल घेतली. राजाश्रयाच्या नावाखाली साहित्य संमेलनाला कोटय़वधी रूपयांचा निधी दिला जातो. दर्शन परिषदही जगभर पोहचविण्यासाठी आम्हाला राजाश्रय हवा आहे, अशी आग्रही मागणी करतानाच शासनाकडून आम्हाला निधीची अपेक्षा नाही तो आम्ही उभा करू, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, तसेच आमदार विजय औटी यांनी त्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी गणेश पारनेरकर यांनी समारोपप्रसंगी केली. सत्यबोधक समाज या मासिकाचे, तसेच ख्याल या संगीतावरील पुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.